गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सूरतच्या पालनपूर जकातनक रोडवरील घरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, 6 जणांनी विष पिऊन टोकाचं पाऊल उचललं आहे. तर एकाने गळफास लावून घेत जीवन संपवलं. मृतांची ओळख पटली आहे. मनिष सोलंकी. त्यांची पत्नी रिता, वडील कनू, आई शोभा आणि तीन मुलं दिशा, काव्य आणि कुशल अशी त्यांची नावं आहेत. मनिष सोलंकी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.
पोलिसांनी घरामध्ये सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये मनिष सोलंकी यांनी आर्थिक समस्यांमुळे आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याची माहिती दिली आहे. पण पोलिसांनी याहून जास्त माहिती दिलेली नाही.
मनिष सोलंकी यांचा फर्निचरचा व्यवसाय होता. त्यांच्या हाताखाली 35 कारपेंटर आणि कामगार कामाला होते. शनिवारी कामगार मनिष सोलंकी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण ते फोन उचलत नसल्याने त्यांना शंका आली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने ते खिडकी तोडून आत शिरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
डीसीपी राकेश बरोत यांनी सांगितलं आहे की, "कुटुंबातील 7 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. आम्ही आत्महत्येच्या कारणाची माहिती घेत आहोत. आर्थिक समस्यांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत". पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.