Tech Layoffs: किराणा माल घरपोच पुरवाणाऱ्या 'डॅन्झो'ने 16 जानेवारी रोजी आपल्या कंपनीमधील तीन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत असल्याची घोषणा केली. कंपनीने रीस्ट्रक्चरिंगचं कारण देत ही कर्मचारीकपात करण्यात आल्याचं म्हटलं आहे. 'डॅन्झो'चे मुख्य कार्यकारी अधिकारी कबीर बिस्वास यांनी एक पत्रक जारी केलं आहे. "लोकांवर परिणाम करणारा कोणताही निर्णय घेणं फार कठीण असतं. मागील आठवड्यामध्ये आमच्या पूर्ण क्षमतेपैकी तीन टक्के लोकांना कंपनीने करारमुक्त केलं," असं बिस्वास यांनी म्हटलं आहे. मात्र नेमक्या किती कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे याबद्दलची माहिती 'डॅन्झो'ने दिली नाही.
'डॅन्झो'ने आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर जवळजवळ तीन हजार कर्मचारी कंपनीत काम करतात असं म्हटलं आहे. म्हणजेच कंपनीने 90 लोकांना कामावरुन काढून टाकलं आहे. या लोकांनी आमच्या कंपनीबरोबर करियर बनवण्याचा निर्णय या लोकांनी घेतला. मात्र आता या लोकांना अशापद्धतीने जाऊन देणं फार क्लेशदायक आहे, असं कंपनीच्या सीईओंनी म्हटलं आहे. कंपनी हा बदल स्वीकारण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत करेल असा शब्दही सीईओंनी दिला आहे.
2023 च्या सुरुवातीलाच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठे धक्के बसले आहे. कर्मचारीकपातीसंदर्भातील आकडेवारीवर काम करणाऱ्या 'ले ऑफ्स डॉट एव्हायआय डॉट' या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार वर्षाच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये म्हणजेच 1 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान 91 टेक कंपन्यांनी 24 हजार 151 लोकांना कामावरुन काढून टाकलं आहे. या मध्ये 'अॅमेझॉन', 'सेल्सफोर्स', 'कॉइनबेस' आणि अन्य टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्याबाबतीत आघाडीवर आहेत. क्रिप्टो एक्सचेंज 'क्रिप्टो डॉट कॉम'नेही 20 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. भारतामध्ये 'ओला' आणि 'स्कीट डॉट एआय'ने पहिल्या महिन्यामध्येच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
'ले ऑफ्स डॉट एव्हायआय डॉट' या वेबसाइटवरील माहितीनुसार 2022 मध्ये एक लाख 53 हजार 110 लोकांनी नोकऱ्या गमावल्या. कर्मचारीकपात करणाऱ्या बऱ्याच कंपन्या या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. यामध्ये प्रमुख्याने मेटा (फेसबुकची पॅरेंट कंपनी), ट्विटर, ओरॅकल, स्नॅप, उबर, इंटेल सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. केवळ नोव्हेंबर महिन्यामध्येच 51 हजार 489 जणांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे.
गुगलही यंदाच्या वर्षी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. गुगल या वर्षी 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकतं असा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीचा कंपनीवर विशेष परिणाम होणार नाही असं द इन्फॉर्मेशन डॉट गुगल लेऑफच्या अहवालात म्हटलं आहे. असं झालं तर 2023 हे वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी धक्का देणारं ठरेल.