बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात ज्या अभिनेत्यांचा दबदबा आहे, त्यांच्यात गोविंदाचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड यांची जोडी सर्वात सुपरिहट ठरली होती. दोघांनी साजन चले सुसराल, बडे मियाँ, छोटे मियाँ, हिरो नंबर 1, राजा बाबू अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तब्बल 18 चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर ही जोडी तुटली. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींमुळे डेव्हिड धवन यांच्यासोबत असणाऱ्या नात्यावर फरक पडला असा दावा केला आहे. तसंच गोविंदा अद्यापही 90 च्या दशकात अडकला असून, त्याची मुलंही त्याचा सल्ला गांभीर्याने घेत नाहीत असंही ती म्हणाली आहे.
हिंदी रश (Hindi Rush) या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता अहुजाने सांगितलं की, "मी नेहमीच म्हणतो की, डेव्हिड माझ्या वडिलांसारखे आहेत. तो काळ असा होता की अभिनेत्यांभोवती त्यांचे चमचे फिरत असत. ते नेहमी गैरसमज निर्माण करायचे. डेव्हिड आणि गोविंद यांच्यातील पार्टनरशिप पाहून अनेकांना मत्सर वाटायचा. जेव्हा तुमच्या आजुबाजूला फक्त नकारात्मक लोक असतात तेव्हा ती नकारात्मकता कुठेतरी तुमच्यातही येते".
सुनिता अहुजाने यावेळी डेव्हिड धवन यांची बाजू घेतली आणि म्हटलं की, त्यांनी कधीच गोविंदाला काही वाईट म्हटलं नाही. याऊलट बदलत्या वेळेसह स्वत:मध्ये बदल कर असा सल्ला देत आहेत.
"डेव्हिडने कधीच काही चुकीचं म्हटलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की, 90 च्या दशकात एकट्या अभिनेत्याचे चित्रपट चालायचे, पण आता तसं होत नाही. आतापर्यंत फार कमी असे चित्रपट चालतात. डेव्हिडने गोविंदाला सेकंड लीड चित्रपट स्विकारण्याचा सल्ला दिला होता. त्याने बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपटात सेकंड लीडची भूमिका निभावली होती आणि ती काही वाईट नव्हती. पण गोविंदाच्या आजुबाजूला असणारे लोक त्याला उसकवत असत की, तूच हिरो आहेस. या गोष्टी कशा घडल्या हे पाहून मला फार राग येतो. गोविंदाच्या आजुबाजूला असणारे लोक चांगले नव्हते. त्यांनी त्याला डेव्हिडच्या विरोधात नेलं," अशी खंत सुनिता अहुजाने व्यक्त केली आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये गोविंदाने आपण तीन चित्रपटांमधून कमबॅक केल्याची घोषणा केली. त्यावही सुनिताने भाष्य करताना संमिश्र भावना व्यक्त केल्या. तिने सांगितलं की, "मला वाटतं की त्याने तीन चित्रपट करण्याबद्दल काही घोषणा केल्या आहेत". आपल्याला जोपर्यंत प्रोजेक्टबद्दल ऐकत नाही तोपर्यंत आपल्या मताशी ठाम असल्याचं तिने सांगितलं आहे. “मी चांगलं की वाईट असेल ते तोंडावर सांगते. तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही. मी 'वाह वाह' प्रोडक्शन नाही, मी 'सही सही' प्रोडक्शन आहे".
सुनिताने त्यांचा मुलगा यशवर्धन आहुजा, जो 2025 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे तोदेखील गोविंदाच्या करिअरच्या सल्ल्याचं पालन करत नसल्याचा खुलासा केला. “गोविंदाचा सल्ला कोणीही ऐकत नाही कारण तो 90 च्या दशकात अडकला आहे. मी 2024 साठी योग्य असा सल्ला देतो. आम्ही गोविंदाला 90 च्या दशकापासून पुढे जाण्यास सांगत असतो,” असं ती म्हणाली.