बिहारच्या (Bihar) सीवान येथे गळ्यात कोब्रा (Cobra) साप घेऊन लोकांना करामत दाखवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. करामत दाखवत असतानाच सापाने त्याच्या ओठांचा चावा (Snake Bite) घेतला. यानंतर काही तासातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इंद्रजीत राम असं या व्यक्तीचं नाव आहे. सापाने चावा घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानतंर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गावातील लोकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत राम जवळपास ८ तास सापाला गळ्यात घालून गावभर फिरत करामती दाखवत होता. यावेळी तो वारंवार सापाचा फणा आपल्या तोंडात टाकून दाखवत होता. तसंच जमिनीवर बसून त्याचा मुका घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने फणा तोंडात टाकताच सापाने त्याच्या ओठाचा चावा घेतला, ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
इंद्रजीत राम याच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या वीटांमध्ये साप लपला होता. हा साप पाहिल्यानंतर लहान मुलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी इंद्रजीत तिथे पोहोचला आणि सापाला पकडलं. सापाला पकडल्यानंतर त्याला आपल्या गळ्यात बांधून तो लोकांना दाखवत घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी लोक त्याच्या करामती पाहत होतो. अनेकांनी त्याला सापाला सोडून देण्यास सांगितलं. पण मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने कोणाचं ऐकलं नाही.
लोकांची गर्दी झाल्याचं पाहून इंद्रजीतला आणखीनच चेव आला आणि तो सापाला गुरुजी हाक मारत मुके घेऊ लागला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो सतत सापासह खेळत होता. पण अखेर ज्याची भीती होती तेच झालं आणि सापाने इंद्रजीतचा चावा घेतला. साप विषारी असल्याने इंद्रजीतचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.