PM Narendra Modi Security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर मोबाईल फेकण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो दरम्यान हा प्रकार घडला आहे. कुणीतरी गर्दीतून हा मोबाईल भिरकवला आहे. मुंबईत नकली कमांडो यांनी मोदींच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला होता.
यापूर्वी देखील कर्नाटकमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी आढळून आली होती. 25 मार्च रोजी एका निवडणूक कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती पीएम मोदींच्या दिशेने धावत आला होता. दावणगिरी येथे हा प्रकार घडला होता. त्यानंतर महिनाभरनंतर पुन्हा एकदा मोदींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कर्नाटकमधील मैसूर येथील चिक्का गडियारा परिसरात पंतप्रधान मोदींचा रोड शो होता. यावेळी पंतप्रधान मोदींवर फुलांची उधळण करण्यात येत होती. यावेळी पंतप्रधान मोदींवर मोबाईल फेकण्यात आला. हा मोबाईल पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील कारच्या बोनटवर पडला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हा मोबाईल ताब्यात घेतला.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर जो मोबाईल फेकण्यात आला तो मोबाईल भाजपच्याच एका महिला कार्यकर्त्याचा आहे. उत्साहाच्या भरात मोदींवर फुल उधळत असताना हा मोबाईल फेकला गेल्याचे सांगण्यात आले. जाणून बुजून मोबाईल फेकला नाही असे या महिला कार्यकर्त्याने पोलिसांना सांगितले.
25 मार्च 2023 रोजी दावणगेरे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदींची रॅली जात असताना त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी जमा झाली होती. नरेंद्र मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या. याचवेळी एका तरुणाने उडी मारली आणि नरेंद्र मोदींच्या दिशेने धावत सुटला. तरुण मोदींच्या गाडीजवळ पोहोचणार इतक्यात तिथे उपस्थित पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला पकडलं आणि बाहेर काढले.
19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसणाऱ्या नकली NSG कमांडोला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) नावाचे बनावट ओळखपत्र वापरून त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी याला अटक केली.