VIDEO : पुन्हा एकदा 'मिग २१'वर स्वार झाले अभिनंदन वर्धमान

अव्हेंजर फॉ़र्मेशन साकारत अभिनंदन यांनी सलामी दिली

Updated: Oct 8, 2019, 04:22 PM IST
VIDEO : पुन्हा एकदा 'मिग २१'वर स्वार झाले अभिनंदन वर्धमान  title=

गाझियाबाद : बालाकोट एअरस्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या हवाईक्षेत्रात घुसू पाहणाऱ्या पाकिस्तानी वायुसेनेला माघारी फिरायला भाग भारतीय वायुसेनेनं भाग पाडलं. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी ज्या विमानाच्या सहाय्यानं पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला त्याच लढावू विमानावर स्वार होत भारतीय हवाईदलाची शक्तीचं प्रात्यक्षिकच त्यांनी आज जगाला दाखवून दिलं. हे विमान होतं मिग २१...  आज गाझियाबादच्या हिंडन एअरबेसमध्ये एअर शो दरम्यान अभिनंदन यांनी पुन्हा एकदा मिग २१ सोबत आकाशात भरारी घेतील.    

वायुदलाच्या या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं लढाऊ विमानांचा फ्लायपास्ट... विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग २१ बायसन विमान स्वतः उडवत 'फ्लायपास्ट'मध्ये सहभाग नोंदवला. अव्हेंजर फॉ़र्मेशन साकारत अभिनंदन यांनी सलामी दिली. या फॉर्मेशनमध्ये ३ मिराज २०००, २ सुखोई ३० विमानंही यात सहभागी झाली. बालाकोट हवाई हल्ल्यात सहभागी वैमानिकांनी या फॉर्मेशनमध्ये सहभाग घेतला.

अभिनंदन यांच्यासोबत बालाकोटचे आणखीन एक हिरो - ग्रुप कॅप्टन सौमित्र तमास्कर यांनी जॅग्वॉर आणि हेमंत कुमार यांनी मिराज २००० सहीत हवेत झेप घेतली.

८७ व्या वायुसेना दिवसानिमित्तानं सेनेत नुकतंच सामील झालेलं अपाचे हेलिकॉफ्टर आणि ट्विन रोटर ब्लेड चिनूक यांशिवाय अनेक विमानांनी हवेत आपल्या कसरती दाखवल्या.

भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांची ही कर्तबगारी उपस्थित अनेकांना अचंबित करून गेली. टाळ्यांच्या गडगडाटानं त्यांनी वायुसेनेच्या पायलटचं अभिनंदन केलं. 

आज भारताचा वायुदलदिन साजरा केला जातोय. वायुदलदिनानिमित्त गाझियाबादच्या हिंडन हवाईतळावर भव्य समारंभ साजरा झाला. तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांनी शहिदांना मानवंदना दिली. वायुदल प्रमुखपदाची सूत्रं हाती घेतल्यावर एअरचीफ मार्शल भदोरिया यांचा हा पहिलाच वायुदल दिन ठरला. वायुदल दिनानिमित्त वायुदलातर्फे शानदार संचलन करण्यात आलं. संचलनानंतर वायुदलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक कसरतीही पार पडल्या. तत्पूर्वी वर्षभरात विविध मोहिमांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्क्वॉड्रनचा आणि वायुयोद्ध्यांचा गौरव करण्यात आला. वायुसैनिकांनी केलेली परेड या सोहळ्याचं आकर्षण होती.  

तसंच, यंदाचा वायुदलदिन देशासाठी खास आहे. कारण वायुदलदिनाचा मुहुर्त साधत  बहुचर्चित राफेल विमान आज भारताला समारंभपूर्वक सोपवलं जाणार आहे. फ्रान्समध्ये हा सोहळा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज फ्रान्समध्ये राफेल विमान स्वीकारतील. राजनाथ पॅरिसमध्ये राफेलचे पुजन अर्थात शस्त्रपूजन करणार आहे. आज  राजनाथसिंह हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेणार असून नंतर ते बोर्डक्सकडे रवाना होतील. नंतर तेथील मेरीगनॅक भागात राफेल विमान हस्तांतरणाचा सोहळा होणार आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली या सोहळ्याला उपस्थित राहतील. नंतर फ्रान्सचा वैमानिक राफेल विमानातून त्यांना सफर घडवेल.