Israel-Hamas War : इस्रायल - हमास युद्धावरुन सध्या जग पेटलं आहे. इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरुन देशात केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाशासित (BJP) केंद्र सरकारनं इस्रायलला समर्थन दिलं असलं तरी काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची (palestine) बाजू लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पॅनेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत भाष्य केलं होतं. त्यावरुन आता शरद पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन केल्याने त्यांच्याविरोधात सरकारमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आधी देशाचा विचार करावा, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी थेट पवारांवरच हल्लाबोल केला आहे.गेल्या रविवारी शरद पवार यांनी पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली होती. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध जागतिक शांततेला धोका असल्याचे पवार म्हणाले होते.
शरद पवारांवर थेट निशाणा साधत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी तिखट प्रतिक्रिया दिली. गोयल यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली. "शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर बेताल वक्तव्ये करत आहेत, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या दहशतवादाच्या धोक्याचा सर्व बाजूंनी निषेध केला पाहिजे. भारताचे संरक्षण मंत्री आणि अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा दहशतवादाशी संबंधित मुद्द्यांवर असा अनौपचारिक दृष्टिकोन असणे खेदजनक आहे. ही मानसिकता थांबवायला हवी. निदान आता तरी देश प्रथम येतो, असा विचार शरद पवार करतील," अशी पोस्ट पियुष गोयल यांनी केली आहे.
It is very disturbing when a senior leader like @PawarSpeaks ji makes preposterous statements on India’s stand on a terror attack in Israel. The menace of terrorism has to be condemned in all forms, in any part of the world. It is a pity that a person who has been India’s Defence…
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 18, 2023
काय म्हणाले होते शरद पवार?
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला होता. तेथील घरे आणि जमीन पॅलेस्टाईनची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इस्रायलने ते ताब्यात घेतले, असेही शरद पवार म्हणाले. देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती, असेही पवार म्हणाले होते. भारताने कधीही कोणाला मदत केली नाही. मात्र, विद्यमान पंतप्रधानांनी इस्रायलला पाठिंबा देऊन मूळ मालकी हक्काला विरोध केला आहे, असे शरद पवार म्हणाले.