नवी दिल्ली : जेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये चिटफंड घोटाळ्याची चौकशी सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत अनेक नेते तुरुंगात गेले आहेत. हा घोटाळा 2013 मध्ये समोर आला होता. सारदा आणि रोज वॅली या 2 कंपन्यांनी चिटफंड घोटाळा केला होता.
1. या दोन्ही कंपन्यांमध्ये लाखो लोकांनी हजारो कोटींची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केल्यानंतर त्यावर मोठा मोबदला देण्याचं आश्वासन देऊन या दोन्ही कंपन्यांनी लोकांची फसवणूक केली. या प्रकरणात राजकारण्य़ांसोबतचं कनेक्शन समोर आलं होतं.
2. कोणत्याही नियमांचं पालन न करता सुरु झालेल्या या दोन्ही कंपन्या वर्ष 2000 पासून पश्चिम बंगाल आणि आजुबाजुच्या राज्यांमध्ये सुरु झाल्या. चिटफंड कंपन्यांच्या या योजनेत अनेकांनी पैसे गुंतवले होते. या दोन्ही कंपन्यांनी लोकांकडून घेतलेला पैसा पर्यटन, रियल्टी, हाउसिंग, रिसॉर्ट आणि हॉटेल, मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात गुंतवला होता.
3. सारदा कंपनी हा 239 खासगी कंपन्यांचा एक समूह होता. एप्रिल, 2013 मध्ये ही कंपनी डुबली. या कंपनीमध्ये एकूण 17 लाख लोकांनी जवळपास 4000 कोटी तर रोज वॅली कंपनीत 15000 कोटी रुपये गुंतवले होते.
4. सारदा समुहाचे सुदिप्तो सेन आणि रोज वॅलीचे गौतम कुंडु यांच्यावर आरोप होता की ते आधी पश्चिम बंगालच्या डाव्या सरकारच्या बाजुने होते. पण राजकीय विश्लेषकांच्या मते, नंतर जेव्हा राज्यात तृणमूल काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा ते तृणमुल काँग्रेसचे समर्थक झाले.
5. दोन्ही समुहांची संपत्ती 2012 मध्ये घटू लागली. लोकांना मोबदला न मिळाल्याने अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या. सारदा समूह एप्रिल 2013 मध्ये बुडाली. त्यानंतर सुदिप्तो सेन आपला सहकारी देबजानी मुखर्जी सोबत बंगालमधून फरार झाला. यानंतर सारदा समुहाचे हजारो एजंट तृणमूल काँग्रेसच्या कार्यालया बाहेर जमा झाले. त्यांनी सेनच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली.
6. सारदा समुहाच्या विरुद्द पहिली तक्रार विधाननगर पोलीस आयुक्तालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर राजीव कुमार यांच्या नेतृत्वात याची चौकशी सुरु झाली. कुमार हे 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या टीमसोबत सेन याला 18 एप्रिल, 2013 मध्ये देबजानी सोबत काश्मीरमधून अटक केली. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटीचं गठन केलं.
7. एसआयटीने तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे तत्कालीन खासदार आणि पत्रकार कुणाल घोष यांना सारदा चिटफंड घोटाळ्यात पहिल्यांदा अटक केली.
8. या प्रकरणात काँग्रेस नेते अब्दुल मनान यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर मे 2014 मध्ये या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपवण्यात आली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि खासदार श्रीनजॉय बोस यांना सीबीआयने अटक केली.
9. सीबीआयने रजत मजूमदार आणि तत्कालीन परिवहन मंत्री मदन मित्रा यांनाही अटक केली. भाजपचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय तेव्हा तृणमूल काँग्रेसचे महासचिव होते. त्यांची देखील सीबीआयने 2015 मध्ये या प्रकरणात चौकशी केली होती.
10. 2015 मध्ये रोज वॅली समुहाच्या कुंडु यांना ईडीने अटक केली. यानंतर डिसेंबर 2016 मध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल आणि जानेवारी 2017 मध्ये सुदीप बंधोपाध्याय यांना देखील अटक करण्यात आली.
11. मागील काही दिवसात सीबीआयने काही पेंटिग जप्त केल्या आहेत. या पेंटिंग पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बनवल्या आहेत. चिटफंड मालकांनी या पेटिंग्स मोठी रक्कम देत खरेदी केल्याचा आरोप आहे.
12. या वर्षी जानेवारीमध्ये सीबीआयने सिने-निर्माते श्रीकांत मोहता यांना देखील अटक केली. यानंतर 2 फेब्रुवारीला सीबीआयने या प्रकरणात कुमार यांची चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं.
13. सीबीआयने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांच्या विरोधात देखील आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात चिटफंड घोटाळ्यातील शारदा समुहाकडून त्यांना 1.4 कोटी रुपये मिळाले आहेत. असा दावा करण्यात आला आहे.
14. याच प्रकरणात पुढे काँग्रेस नेते मतंग सिंह आणि त्यांची पत्नी मनोरंजना सिंह यांना देखील अटक झाली.
15. या प्रकरणात 2015 मध्ये मोदी सरकारने अनिल गोस्वामी यांना गृह सचिव पदावरुन हवटलं होतं. त्यांच्यावर आरोप होता की, गोस्वामी यांनी सारदा प्रकरणात चौकशी करणाऱ्य़ा अधिकाऱ्यांना फोन करुन चौकशीबाबत माहिती मागितली होती.