पुलवामा हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 'जैश'च्या अनेक टॉप कमांडर्सचाही समावेश आहे.

Updated: Apr 22, 2019, 06:25 PM IST
पुलवामा हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश title=

नवी दिल्ली: पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यामध्ये ६६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. यापैकी २७ दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे कळते. विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांत जैश-ए-मोहम्मदच्या १९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यात सहभागी असणारे जैश-ए-मोहम्मदचे सर्व दहशतवादी ठार झाले आहेत. यासाठी तांत्रिक गुप्तचर विभाग आणि खबऱ्यांची मदत घेण्यात आली. या ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 'जैश'च्या अनेक टॉप कमांडर्सचाही समावेश आहे. यापैकी काही जणांची छायाचित्रे सोमवारी भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आली.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा परिसरातून सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी आतमध्ये घुसवली होती. ही गाडी सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसवर आदळली. यावेळी झालेल्या भीषण स्फोटात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायूदलाकडून बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक करण्यात आला होता.