अमरनाथ : अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यात गुजरातमधील सात भाविकांचा मृत्यू झाला. पण बसमध्ये असलेल्या अन्य 50 यात्रेकरूंचे प्राण वाचले ते बसचालक सलीम याच्या जिगरबाजपणामुळे.
दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत असतानाही या पठ्ठ्यानं अजिबात विचलित न होता बस चालवणं सुरूच ठेवलं. सुरक्षित जागी पोहोचल्यावरच त्यानं ती बस थांबवली. सलीमच्या या धाडसाचं सर्वांनीच कौतुक केलं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तर शौर्य पुरस्कारासाठी सलीमच्या नावाची शिफारस करणार आहेत.
अमरनाथ यात्रेवर काल झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोएबाचा दहशतवादी इस्माईल असल्याचं आयबीच्या सूत्रांच म्हणणं आहे. इस्माईल हा पाकिस्तानी दहशतवादी आहे, काही दिवसांपासुन लष्कर ए तोएबाच्या स्लीपर सेलमध्ये होता. त्यानचं या हल्लाचा कट रचून अंमलात आणला अशी माहिती पुढे येते आहे.
काल इस्माईलसह एकूण पाच दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. त्यापैकी दोघे लष्करचे पाकिस्तानमधले तर दोघे स्थानिक तरुण होते. या सर्वांनी गोळीबार करून सात भाविकांचे प्राण घेतल्याचं आता पुढे येतं आहे.