'अशी स्मशानभूमी उभारू की वृद्धही मृत्यूची वाट पाहतील'

हे विधान भलतंच चर्चेत आहे. 

Updated: Apr 19, 2019, 02:34 PM IST
 'अशी स्मशानभूमी उभारू की वृद्धही मृत्यूची वाट पाहतील' title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ रंगात आलीय. मतदाराला आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांकडून सर्व ताकद पणाला लावण्यात येतेय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवार वेगवेगळी आश्वासने, घोषणा देताना दिसत आहेत. परंतु काँग्रेस पक्षाचे नेते अमरिंदर सिंह राजा वरिंग यांच्या एका अजब आश्वासनाने मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. फरीदकोट लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना अमरिंदर यांनी हे वादग्रस्त आणि अजब वक्तव्य केलं. 

'स्मशानभूमीवर विरोधी पक्षांचे नेते दुर्लक्ष करीत आले आहेत. परंतु, आम्ही निवडून आलो तर ८० वर्षांच्या वृद्धालाही मृत्यूची इच्छा होईल, अशी स्माशानभूमी बनवू' या त्यांच्या विधानाला नेमका प्रतिसाद द्यावा तरी कसा? असा प्रश्न श्रोत्यांना आणि मतदारांना पडलाय. अमरिंदर सिंह यांच्या या विधानावर विरोधी पक्षानं मात्र टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

टीकेनंतर आपली बाजू मांडताना अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी, 'माझे विधान अर्धवट प्रसिद्ध करण्यात आलं. माझ्याविषयी जनतेच्या मनात गैरसमाज निर्माण व्हावा यासाठी विरोधी पक्षाचा हा कट आहे. कुणालाही दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता... मी वृद्धांचा सन्मान करतो' असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय. 
 
काय म्हणाले होते?
'विरोधकांनी या मतदारसंघात स्मशानभूमीवर थोडेही लक्ष दिले नाही. परंतु, आमची सत्ता आल्यास सरकार स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च केले जातील. याठिकाणी अशी स्मशानभूमी बनवू की ८० वर्षांच्या वृद्धालाही लवकर मृत्यूची इच्छा होईल... घरातील मुलेही म्हणतील की या वृद्धांचा मृत्यू का नाही होत? म्हणजे त्यांनाही या समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जाता येईल' असं त्यांनी सर्वांदेखत म्हटलं. राजकीय व्यासपीठावर बोलताना काँग्रेस आमदार अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी केलेलं हे विधान भलतंच चर्चेत आहे.