Pikachu Jet Arrived In Delhi: भारतामधील जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांनी पोकेमॉन थीमच्या बोइंग 787 विमानासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक भारतीयांचं लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. हिरोशी सुजुकी यांनी जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेजच्या (एएनए) स्पेशल विमानाचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने नुकतेच आपल्या या खास विमानाचं उद्घाटन केलं. या विमानावर पोकेमॉन या प्रसिद्ध जपानी कार्टून सिरीजमधील पोकेमॉन रेखाटण्यात आले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेला हा विमानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत पडला आहे.
"भारतामध्ये पिकाचूचं स्वागत आहे. एएनएच्या या पिकाचू जेटने पहिल्यांदाच दिल्लीसाठी उड्डाण केल्याचं पाहून फार आनंद झाला. हे विमान आता दिल्लीच्या आकाशात चकाकण्यासाठी तयार आहे," अशी कॅप्शन हिरोशी सुजुकी यांनी या फोटोला दिली आहे. विमानाचं मुख्य आकर्षण हे त्याचं नाव आहे. या विमानाचं नाव पिकाचू असं ठेवण्यात आलं आहे. पोकेमॉन सिरीजमधील लोकप्रिय कॅरेक्टर असेला पिकाचू हा एखाद्या मोठ्या आकाराच्या उंदराप्रमाणे दिसणारा काल्पनिक प्राणी आहे. जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरमध्ये पिकाचूचा समावेश होता.
पिकाचू जेटच्या बाहेरील बाजूस अनेक कार्टून कॅरेक्टर्सची चित्र काढण्यात आली आहे. यामध्ये हिरव्या, भगव्या, पिवळ्या, निळ्या रंगात वेगवेगळ्या पोकेमॉनची चित्र काढण्यात आली आहेत. विमानाच्या पंख्यावर पोकेबॉलचं चित्र काढण्यात आलेलं आहे. या विमानाच्या आतील भागातही पिकाचू थिम असल्याचं सांगितलं जात आहे.
या विमानाचा फोटो पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे. ही पोस्ट पोकेमॉनच्या चाहत्यांना फारच आवडली आहे. या पोस्टला एका लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडोच्या संख्येनं या पोस्टला रिट्वीट आणि शेअर्स मिळाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन हे विमान फारच छान दिसत असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी या विमानावरील कलाकारी लक्ष वेधून घेणारी आणि फारच आकर्षक असल्याचं म्हटलं आहे. 1990 च्या दशकामधील अनेकांनी हे विमान पाहून आपलं बालपण आठवल्याची भावना व्यक्त केली आहे. बऱ्याच जणांनी आपल्या बालपणीच्या सर्वात लोकप्रिय कॅरेक्टरला अशाप्रकारे थेट विमानावर स्थान दिल्याबद्दल या जपानी कंपनीचे आभार मानले आहेत.
जपानची राजधानी असलेल्या टोकियोवरुन हे विमान दिल्लीमध्ये दाखल झालं आहे. या मार्गावरील विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष विमानाने उड्डाण घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.