Keshub Mahindra Death : आनंद महिंद्रा यांचं नाव घेतलं की सोशल मीडियाच्या (Anand Mahindra Twitter) माध्यमातून ते इतरांशी साधतात तो संवाद आठवतो, नव उद्यमींविषयीचं त्यांचं कुतूहल आठवतं. पण, हेच कायम सकारात्मक दृष्टीकोनानं जगाकडे पाहणारे आनंद महिंद्रा सध्या मात्र दु:खाच्या प्रसंगातून जात आहेत. कुटुंबापुढं आलेली ही वेळ पाहता अनेकजण सध्या त्यांना आधार देताना दिसत आहेत. कारण, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे.
ही व्यक्ती म्हणजे केशब महिंद्रा (Keshub Mahindra). देशातील सर्वात वयोवृद्ध आणि प्रख्यात उद्योजपती अशी ओळख असणारे Mahindra and Mahindra समुहाचे माजी माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांनी वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण उद्योग जगत हळहळलं. केशब महिंद्रा हे आनंद महिंद्रा यांचे काका आणि या क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शक.
9 ऑक्टोबर 1923 रोजी केशब महिंद्रा यांचा जन्म शिमला येथे झाला होता. तिथंच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते पेंसिल्वेनिया विद्यापीठात पदवी शिक्षणासाठी गेले. कारकिर्दीचीसुरुवातच त्यांनी महिंद्रापासून केली. त्याशिवाय टाटा स्टील, टाटा केमिकल्स, आयएफसी अशा बड्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय मंडळातही त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. साधी राहणी, उच्च विचारसरणीचीच झलक त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासातून इतरांना पाहायला मिळाली.
महिंद्रा अँड महिंद्राला सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्यांमध्ये केशब महिंद्रा यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं ठरलं. 1963 ते 2012 पर्यंतच्या काळात त्यांनी या समुहाचं अध्यक्षपद भुषवलं. जवळपास 48 वर्षे हा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी कंपनीची सर्व सूत्र आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवली. योग्य वेळी त्यांनी उत्पादन निर्मितीला वेग देत काही अमूलाग्र बदलांसह Real Estate, आर्थिक सुविधा आणि हॉस्पिटलिटी क्षेत्रांमध्ये कंपनीचा विस्तार केला.
A Century of uncompromising Integrity and Values.
We will not stray from that path.Om Shanti. pic.twitter.com/Mt24zLwyj7
— anand mahindra (@anandmahindra) April 12, 2023
फोर्ब्सच्या यादीतही नाव...
यंदाच्याच वर्षी जाहीर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीतही केशब महिंद्रा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. फोर्ब्सच्या बिलिनियर्स यादीनुसार केशब महिंद्रा यांची एकूण संपत्ती 1.2 बिलियन डॉलर्स इतकी असून, निधनानंतर ते ही कोट्यवधी रुपयांची संपत्ती पाठीशी सोडून गेल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमांमध्ये किंवा झगमगाटापासून सहसा दूर राहणाऱ्या केशब महिंद्रा यांनी कायमच त्यांच्या वागण्यातून तरुण पिढीसाठी आदर्श प्रस्थापित केला. अशा या ज्येष्ठ उद्योजकाला भावपूर्ण श्रद्धांजली!