देशात पुन्हा एकदा नोटबंदी?

 आता या नोटबंदीमध्ये २००० रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे.

Updated: Jul 26, 2017, 09:26 PM IST
देशात पुन्हा एकदा नोटबंदी? title=

नवी दिल्ली : मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता  ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. तसाच पुन्हा निर्णय होण्याची जोरदार चर्चा आहे. आता या नोटबंदीमध्ये २००० रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे.

केंद्र सरकारकडून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर आता दोन हजारांची नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा संसदे पोहोचली. त्यामुळेच राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबद्दल प्रश्न विचारले. मात्र विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी केली. मात्र, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणात गप्प राहणेच पसंत केले.

जेटली यांच्या शांत राहण्यामुळे सरकार पुन्हा एकदा नोटाबंदी करण्याच्या विचारात असल्याची जोरदार चर्चा संसदेत होताना दिसत आहे. याबाबत इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिलेय. 

गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात २००० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवत आहे. त्याचवेळी २०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरु आहे. तसेच २० रुपयांची नवी नोट बाजारात  येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नोटबंदीच्या हालचाली असल्याचे बोलले जात आहे.

  २००० रुपयाच्या नोटेचे मूल्य सर्वाधिक असल्याने या नोटांची साठवणूक सहज केली जाऊ शकते. या नोटांच्या तुलनेत इतर नोटा मोठ्या प्रमाणात जमा करता येणे कठीण आहे. त्यामुळे नोटबंदीची चर्चा आहे.