रक्त गोठवणाऱ्या थंडीत 'स्नो ग्लासेस'अभावी सैनिकांचा संघर्ष

अनेक गोष्टी नसल्यामुळे त्यांना या परिसरात तग धरणंही कठीण होत असल्याचं चित्र 

Updated: Dec 14, 2019, 12:02 PM IST
रक्त गोठवणाऱ्या थंडीत 'स्नो ग्लासेस'अभावी सैनिकांचा संघर्ष  title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : सध्या सुरु असणारी थंडीची लाट पाहता साऱ्या देशात याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. यामध्येच आता जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीन Siachin भागात आणि Ladakh लडाखमधील काही परिसरांमध्ये तैनात असणाऱ्या भारतीय सैन्यदलातील सैनिकांनाही या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. 

कॅगच्या अहवालानुसार भारतीय सैन्यदलातील जवानांना बहुउपयोगी बुट, बर्फात लावायचे गॉगल आणि सैन्यदलाला पुरवलं जाणारे अन्नधान्याचे पदार्थ या सर्व गोष्टींअभावी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॅगकडून केंद्रीय सरकारच्या संरक्षण शाखांचा (भारतीय सेना) हा अहवाल राज्यसभेद मांडण्यात आला. पण, लोकसभेत मात्र ते अपयशी ठरले. 

भारतीय सैन्यदलातील जवानांना पुरवल्या जाणाऱ्या स्नो ग्लासेसच्या तुटवड्याचं प्रमाण हे आता ६२ टक्क्यांवरुन ९८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. ज्याचा वापर समुद्रसपाटीपासून अतीउंचावर असणाऱ्या या ठिकाणांवर सैनिकांचा चेहरा आणि त्यांच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी करण्यात येतो. नोव्हेंबर २०१५ आणि सप्टेंबर २०१६ दरम्यानही सैनिकांना अशा सामग्रीच्या तुटवड्याला सामोरं जावं लागलं होतं, ज्यावेळी त्यांना जुन्याच सामग्री आणि साधनांवर वेळ काढावी लागली होती. 

दरम्यान, CAGच्या अहवालानुसार समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर तैनात असणाऱ्या भारतीय सैन्यातील जवानांना सध्याच्या घडीला जुन्या तंत्रज्ञानाचे फेस मास्क, जॅकेट आणि स्लिपिंग बॅग देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने या सर्व परिस्थितीची दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.