मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) सुरू केले. या मिशनच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देश स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा परिणाम देशात मोठ्या प्रमाणात दिसून आला. पण त्यावेळीही देशात अशी जागा होती, जिथे या अभियानाची गरज नव्हती, या गावाने स्वच्छतेच्या बाबतीत एक आदर्श घालून दिला आहे. या गावाचे नाव मल्लिनॉन्ग (Mawlynnong) असून ते मेघालयच्या (Meghalaya) पूर्व खासी हिल्समध्ये आहे.
या गावाला देवाची बाग असे देखील म्हणतात. यावरून या गावाच्या सौंदर्याचा अंदाज लावता येतो. अनेक वर्षांपासून हे गाव स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे.
झाडांच्या मुळांपासून पूल
या गावात झाडांच्या मुळापासून पूल तयार करण्यात आले आहेत. या पुलांचे सौंदर्य नजरेत भरले असून ते ट्रेकिंगसाठीही खास आहेत.
प्लास्टिक बंदी
या सुंदर गावात प्लास्टिकचा वापर केला जात नाही. येथे बांबूपासून बनवलेल्या डस्टबिनचा वापर केला जातो. या गावात लोक वस्तू वाहून नेण्यासाठी कापडी पिशव्या वापरतात. येथील मुलेही स्वच्छतेची विशेष काळजी घेतात.
साक्षरता दर 100 टक्के
या गावातील सर्व लोक सुशिक्षित आहेत. हे एक आदर्श गाव आहे. झाडांसाठी खत बनवण्यासाठी येथील लोक कचरा खड्ड्यात ठेवतात.
हे गाव महिला सक्षमीकरणाचे उदाहरणही सादर करते. येथे मुलांना आईचे आडनाव मिळते आणि वडिलोपार्जित मालमत्ता आई घरातील सर्वात लहान मुलीला देते.
हे गाव धबधबा, ट्रेक, लिव्हिंग रूट ब्रिज, डोकी नदीसाठी प्रसिद्ध आहे. येथील निसर्गसौंदर्य तुमचं मन जिंकून घेते. या गावात अनेक रंगीबेरंगी फुलांच्या बागा असून त्या सौंदर्यात आणखी भर घालतात.