विधानसभा निवडणुकीत ट्विटरवर काय घडलं माहितीये?

सोशल मीडिया आता प्रचारासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

Updated: Dec 12, 2018, 10:20 AM IST
विधानसभा निवडणुकीत ट्विटरवर काय घडलं माहितीये? title=

मुंबई - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी लागले. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची सुरु असलेली रणधुमाळी अखेर शांत झाली. पण या काळात प्रचाराचे एकही व्यासपीठ राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सोडले नाही. सोशल मीडियावरही प्रचारासाठी सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला. ट्विटरवरने मंगळवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या आकड्यांनुसार निवडणुकीच्या ७२ दिवसांच्या काळात ट्विटरवर ६६ लाखांहून अधिक ट्विट करण्यात आले. #AssemblyElection2018 या हॅशटॅगचा वापर करून हे ट्विट  करण्यात आले. राजकीय पक्षांसोबतच अनेक सर्वसामान्य लोकांनीही या हॅशटॅगचा ट्विटसाठी वापर केला. 

सोशल मीडिया आता प्रचारासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्वच माध्यमांचा प्रचारासाठी वापर केला जातो. अंतिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही माध्यमे उपयुक्त ठरतात, हे सुद्धा राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या काळात ट्विटरचा वापर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यावेळी ६६ लाख ट्विट एकाच हॅशटॅगचा वापर करून करण्यात आल्यामुळे त्याचा नेमका वापर होऊ लागल्याचे स्पष्ट झाले. येत्या मे महिन्यात लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पुन्हा एकदा राजकीय कारणांसाठी या माध्यमांचा वापर सुरू होणार आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाचही राज्यांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, तो सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिथे काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला दोन तृतियांश बहुमत मिळाले आहे. ते गुरुवारीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर मिझोराममध्ये काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे. तिथे मिझोराम नॅशनल फ्रंटला बहुमत मिळाले आहे. 

या पाचही राज्यातील लोकांनी आणि राजकीय पक्षांच्या समर्थकांनी ट्विटरवर विविध प्रकारची मते मांडण्यासाठी #AssemblyElection2018 या हॅशटॅगचा वापर केला. त्यामुळे ६६ लाखांपेक्षा जास्त ट्विट या एकाच हॅशटॅगमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.