भातप्रेमी दक्षिण भारतात का अचानकच वाढलीये गव्हाच्या पिठाची विक्री?

तांदुळ किंवा तांदळापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांची दक्षिण भारतात प्राधान्यानं रेलचेल. 

Updated: May 26, 2022, 10:29 AM IST
भातप्रेमी दक्षिण भारतात का अचानकच वाढलीये गव्हाच्या पिठाची विक्री?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश भागांमध्ये तांदुळाला प्रचंड मागणी असते. विविध प्रकारचा तांदुळ विविध कारणांनी आणि तितक्याच बहुविध पद्धतींनी वापरला जातो. तांदुळ किंवा तांदळापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांची दक्षिण भारतात प्राधान्यानं रेलचेल. 

कोरोनानं मात्र हे समीकरणही बदललं आणि तिथं सर्वांच्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलल्या. सूत्रांच्या माहितीनुसार देशभरात पाकिटबंद गव्हाच्या पिठाची विक्री वाढली असून, याचं 18 टक्के प्रमाण दक्षिण भारतातून असल्याचं कळत आहे. (atta getting sold in south india even more than rice read details )

2020 मध्ये हे प्रमाण 15 टक्के इतकंच होतं. जाणकारांच्या मते, कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या सामग्रीमध्ये तांदुळासोबतच गव्हाचं पीठही देण्यात आलं होतं. याचेच परिणाम आता गव्हाच्या पिठाच्या वाढलेल्या मागणीत परावर्तित झाले आहेत. 

सहसा खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं अशक्य असतं. दक्षिण भारतात तर, तांदुळ, भात आणि तत्सम पदार्थांकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिलं जातं. पण, PMGKY योजनेअंतर्गत गरीब आणि गरजूंना गव्हाचं पीठही उपलब्ध झालं आणि दोन वर्षांत याची नागरिकांना सवयही झाली.

दक्षिण भारतात गव्हाच्या पिठाची वाढलेली विक्री हा विषय सध्या संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे या भागात जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सकारात्मक बाब आहे, कारण तांदुळाचे पदार्थ खाऊन एका वेळेस कंटाळा आल्यास अशा मंडळींनाही काही पर्याय नव्यानं उपलब्ध असतील.