नवी दिल्ली : बाबरी प्रकरणी शिया धर्मगुरुंनी अत्यंत महत्त्वाचं आवाहन मुस्लीम समाजाला उद्देशून केलं आहे. बाबरीप्रकरणी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो मुस्लिम समाजानं स्वीकारला पाहिजे, असं आवाहन शिया धर्मगुरू डॉ. कलबे सादिक यांनी केलं आहे.
मुंबईत विश्व शांती परिषद सुरु आहे. जागतिक स्तरावरच्या संमेलनासाठी विविध धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या धर्मगुरूंनी हजेरी लावली. यावेळी डॉ. कलबे सादिक बोलत होते.
बाबरी मशिदी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं जरी विरोधात निर्णय दिला तरी मुस्लिम समाजानं कोणताही विरोध करू नये, आपल्याला भूखंड नाही तर देशातल्या जनतेचं हृदय जिंकायचं आहे, असं आवाहनही कलबे सादिक यांनी केलं.
या संमेलनाला दलाईलामा, बाबा रामदेव, जैनाचार्य डॉ.लोकेश मुनी, शीख धर्मगुरू अकालतख्तचे प्रमुख जत्थेदार ज्ञानी गुरुबचनसिंह मुंबईत आले आहेत.