Bank 5 Days Working: देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठीची मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच देशातील सर्व बँकांना फाइव्ह डेज विक म्हणजेच पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील हलचालींना वेग आला असून लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. सध्या भारतीय बँकांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कामकाज होत नाही. मात्र नवीन धोरण लागू झाल्यास सर्वच शनिवारी बँका बंद राहतील.
बिझनेस लाइनने दिलेल्या वृत्तानुसार, 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांच्या युनियन्सने केली आहे. 28 जुलै रोजी झालेल्या इंडियन बँक असोसिएशनच्या बैठकीमध्ये ही मागणी मांडण्यात आली आणि ती संमतही झाली. भारतामधील सर्व बँकांना 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची दाट शक्यता आहे. देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांची संस्था असलेल्या इंडियन बँक असोसिएशनने 5 दिवस कामकाज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव लवकरच अर्थमंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव अर्थमंत्रालयाने मंजूर केल्यास बँकांना सर्व शनिवारी सुट्टी मिळेल. म्हणजेच आता चार आठवड्यांचा महिना असेल तर बँक कर्मचाऱ्यांना महिन्याला 8 सुट्ट्या मिळतील. सध्या सर्व बँकांमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी कामकाज चालते. मात्र नव्या धोरणानुसार सर्वच शनिवारी बँका बंद राहतील.
या प्रस्तावाला मंजूरी मिळेल असा विश्वास इंडियन बँक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आहे. याचसंदर्भात बोलताना एका संबंधित अधिकाऱ्याने, "अर्थमंत्रालयाशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवरुन असं दिसून येत आहे की केंद्र सरकारला बँकांच्या युनियनने एकत्रितरित्या केलेला हा ठराव मान्य करण्यास काही अचडण नसावी असं दिसत आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'ऑल इंडिया बँक एम्पलॉय असोसिएशन'ने मार्च महिन्यामध्येच 5 दिवसांच्या आठवड्याला मंजूरी द्यावी असं म्हटलं होतं. "एकूण कामाच्या कालावधीमध्ये 40 मिनिटांची वाढ करता येऊ शकते. यापैकी रोखी व्यवहाराचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत असेल. तर रोखीच्या व्यवहारांनंतर 4.30 वाजेपर्यंत बँकांचं काम सुरु राहील," असं 'ऑल इंडिया बँक एम्पलॉय असोसिएशन'ने आपल्या प्रस्तावात म्हटलेलं.
सध्या कॉर्पोरेट क्षेत्रातील नियमांनुसार 5 दिवसांचा आठवडा असल्यास 8 ऐवजी 9 तास काम करावं लागतं. हेच धोरण देशातील सर्व बँकांना लागू करण्याचा मानस आहेत. म्हणजेच बँका 5 दिवसच सुरु राहणार असतील तर बँकांच्या कामकाजाची कालावधी वाढवला जाईल. आता महिन्यातून 2 आठवड्यांमध्ये शनिवारी सुट्टी असताना बँकेतील कर्मचारी 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हे सूत्रही फाइव्ह डेज विक सुरु झाल्यानंतर बदलेल. बँकांना दर दिवशी ग्राहकांशी संबंधित सेवा देण्याचा कालावधी 45 मिनिटांनी वाढवावा लागेल असं सांगितलं जात आहे.