जनरल रावत यांच्याआधी या देशाच्या सैन्य प्रमुखांचा ही हेलिकॉप्टर अपघातात झाला होता मृत्यू

बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Updated: Dec 8, 2021, 11:33 PM IST
जनरल रावत यांच्याआधी या देशाच्या सैन्य प्रमुखांचा ही हेलिकॉप्टर अपघातात झाला होता मृत्यू

मुंबई : भारताचे CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात अचानक निधन झाले. भारतीय वायुसेनेने सांगितले की, लष्करी हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. जनरल रावत यांच्या पत्नीही या अपघाताचा बळी ठरल्या. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जनरल रावत यांचा मृत्यू अशा वेळी झाला आहे जेव्हा भारत आणि चीन यांच्या सीमेवर अनेक दिवसांपासून तणाव आहे. भारतासाठी हा काळ आव्हानात्मक मानला जात आहे.

संरक्षण तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी सांगितले की, चीनसोबतच्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या सीमेवरील तणावामुळे हिमालयीन आघाडीवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 लष्करी जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापासून त्यांनी गेल्या वर्षी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघाताची आठवण करून दिली.

तैवानच्या लष्करप्रमुखांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

चेलानी यांनी लिहिले, 'जनरल रावत यांचा मृत्यू 2020 च्या सुरुवातीला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातासारखाच आहे, ज्यामध्ये तैवानचे चीफ ऑफ जनरल स्टाफ मारले गेले होते. यात शेन यी-मिंग आणि दोन प्रमुख जनरलांसह सात इतरांचा समावेश होता.

ते म्हणाले, या विचित्र साम्याचा अर्थ असा नाही की दोन हेलिकॉप्टर अपघातांमध्ये कोणताही दुवा किंवा बाहेरचा हात होता. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक अपघाताने महत्त्वाचे अंतर्गत प्रश्न निर्माण केले आहेत, विशेषत: सर्वोच्च व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या लष्करी हेलिकॉप्टरच्या देखभालीबाबत. सध्या जनरल रावत यांच्या विमान अपघाताचे कारण समजले नसून हा तपासाचा विषय आहे.