विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं

Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 29, 2024, 06:45 AM IST
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं title=
आरोपीला पोलिसांनी अटक केली (फोटो - आयएएनएस आणि सोशल मीडियावरुन साभार)

Airport Attack: देशातील विमानतळांवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकारे बंगळुरूमधील (Bengaluru) केम्पेगोडा अंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे. या विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची विमानतळ परिसरात घुसून हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने विमानतळावर चक्क कोयत्याने या कर्मचाऱ्याला संपवल्याने एकच खळबळ माजली. विमानतळासारख्या सुरक्षित ठिकाणी असे हल्ले होत असल्याने सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामधूनच त्याने ही हत्या केली. सोशल मीडियावर या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कर्मचाऱ्याच्या मृतदेहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहेत.

पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याने हत्या

या प्रकरणामधील आरोपी आणि त्याच्या पत्नीचा 2022 मध्येच घटस्फोट झाला आहे. महिलेचे अन्य पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करण्यात आला. या महिलेचे विमानतळावरील कर्मचाऱ्याबरोबर प्रेमसंबंध होते. हा कर्मचारी विमानतळावर ट्रॉली व्यवस्थापन विभागामध्ये कामाला होता. यापूर्वीही त्याच्या प्रेयसीच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने त्याला ठार करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मरण पावलेल्या व्यक्तीला त्याच्या गावात जाऊन ठार मारण्याचा हल्लेखोराचा विचार होता. मात्र तो विमानतळावर काम करतो असं समल्यानंतर आरोपीने कट रचून त्याची हत्या केली.

हत्यार विमानतळावर पोहोचले कसे?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोयता बॅगमध्ये टाकून आणला होता. बॅगेत कोयता टाकून तो थेट विमानतळावर जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये चढला. बसमधून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांची फारशी तपासणी होत नाही. विमानतळावर पोहचल्यानंतर आरोपी बराच वेळ पत्नीच्या प्रियकराची म्हणजेच ट्रॉली विभागात काम करणाऱ्या व्यक्तीचा वाट पाहत होता. तो बाहेर आल्यानंतर आरोपीने बॅगेतून कोयता काढून विमानतळावरील कर्मचाऱ्याची हत्या केली. टर्मिनल 1 जवळच्या पार्किंग लॉटमध्ये हा सारा प्रकार घडला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मरण पावलेल्या विमानतळ कर्मचाऱ्याचं नाव रामकृष्ण असं आहे. तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव रमेश असं आहे. सायंकाळी 7 च्या सुमारास हा सारा प्रकार घडल्यानंतर देवनहल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने हे हत्यार कुठून आणले, त्याला हे विमानतळापर्यंत आणू देण्यास कोणी मदत केली का? या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का या आणि अशा प्रशांनीच उत्तरं पोलीस शोधत आहेत.