Bengaluru Crime: 28 फ्लॅट्सपैकी 1 फ्लॅट सुनेला देण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या

Bengaluru Unemployed Youth Hires Hitmen To Kill Father: या प्रकरणामध्ये आरोपी असणारा मुलगाच आधीच साक्षीदार होता. त्यानेच दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला.

Updated: Mar 1, 2023, 02:05 PM IST
Bengaluru Crime: 28 फ्लॅट्सपैकी 1 फ्लॅट सुनेला देण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या title=
Bengaluru Crime News

Bengaluru Crime News: बंगळुरु पोलिसांनी (Bengaluru Police) तीन आरोपींना एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या 70 वर्षीय व्यक्तीची 13 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. मराठाहल्ली येथील कावेरप्पा परिसरामध्ये राहणाऱ्या नारायण स्वामी यांच्यावर दोन बाईकस्वारांनी प्राणघातक हल्ला केला. मोठ्या चाकूने नारायण यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नारायण यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण नारायण स्वामींचा मुलगाच आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या तपासामध्ये मणीकांता नावाचा हा मुलगाच साक्षीदार होता. मात्र नंतर त्याच्याच सांगण्यावरुन ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.

या गोष्टीमुळे वडिलांबरोबर होता वाद

संपत्तीवरुन झालेल्या वादामधून मणीकांतानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे. 32 वर्षीय मणीकांता हा बेरोजगार आहे. मणीकांताने आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देताना प्रत्येकी 1 कोटी रुपये आणि दोन्ही मारेकऱ्यांना प्रत्येकी एक फ्लॅट देण्याचं आश्वासन दिलं होतं. नारायण यांचे बंगळुरुमध्ये एकूण 28 फ्लॅट्स आहेत. यापैकी एक फ्लॅट त्यांनी मणीकांताच्या पत्नीला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. यावरुनच त्यांच्यामध्ये आणि मणीकांतामध्ये वाद झाला. मणीकांताची पत्नी अर्चनाला फ्लॅट भेट म्हणून देण्यावर नारायण ठाम होते. मात्र मणीकांताचा याचा विरोध होता.

सासऱ्यांना सुनेच्या नावावर करायचा होतो एक फ्लॅट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना ही मणीकांताची दुसरी पत्नी होती. 2013 साली आपल्या पहिल्या पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणामध्ये यापूर्वी मणीकांताची पोलीस चौकशीही झाली होती. 2020 साली मणीकांताला पोलिसांनी पहिल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपामधून मुक्त केल्यानंतर त्याने अर्चनाशी लग्न केलं. मात्र मागील काही महिन्यांपासून मणीकांता आणि अर्चनामध्ये खटके उडू लागले. मणीकांता आपल्या पत्नीला त्रास द्यायचा हे पाहून नारायण यांनी एक फ्लॅट अर्चनाला देण्याचा निर्णय घेतला. अर्चना आणि तिच्या लहान मुलीला एक फिक्स इन्कम मिळावे या विचाराने नारायण यांनी हा फ्लॅट अर्चनाला भेट करण्याचा निर्णय घेतलेला.

वडिलांची सुपारी दिली

एक फ्लॅट, 1.7 एकर जमीन आणि 15 लाख रुपये कॅश एवढी संपत्ती नारायण स्वामी यांनी अर्चनाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मणीकांतला हे मान्य नव्हतं. त्यामुळेच मणीकांताने आपल्या वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मणीकांताने दोन हल्लेखोरांशी संपर्क साधला. अधार टी आणि एन. एम. शिवा कुमार असं या हल्लेखोरांची नावं आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये आणि एक एक फ्लॅट देण्याचं आश्वासन मणीकांताने हल्लेखोरांना दिलं. त्याने अॅडव्हान्स म्हणून या दोघांना 1 लाख रुपये कॅश दिले.

पोलिसांना आली शंका अन्...

13 फेब्रुवारी रोजी या हल्लेखोरांनी नारायण स्वामींवर त्यांच्या राहत्या घराबाहेर चाकूने हल्ला केला. या प्रकरणामध्ये मणीकांता हा साक्षीदार होता. त्यानेच पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. मात्र तपासादरम्यान मणीकांताची गुन्हेगारी पार्श्वभूमीव लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी मणीकांताचा घरातच संपत्तीवरुन वाद सुरु होता हे पोलिसांना समजलं. त्यानंतर सोमवारी त्याला अटक करुन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.