मुंबई : भारतात अनेक अशी ठिकाणं आहेत जी पावसाळ्यात खुलून दिसतात. त्यांचं आगळवेगळं सौंदर्य पाहण्यासाठी लोक पावसाळ्यातील ट्रिप काढतात. धबधबा असो किंवा सुंदर ठिकाणं पर्यटक किंवा ग्रूपने सहल किंवा एक छोटी पिकनिक पावसाळ्यात झालीच पाहिजे असं असतं.
यंदाच्या पावसात तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर ही खास ठिकणं तुमच्यासाठी आहेत. तिथे जाण्यासाठी नक्की विचार करायला हरकत नाही. महाराष्ट्राबाहेर फिरण्यासाठी ही ठिकाणी उत्तम आहेत.
राजस्थान : राजस्थानमध्ये गुलाबी शहर, राजवाडे आणि प्राचीन काळातील अनेक सुंदर गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मान्सून बेस्ट टुरिस्टर डेस्टिनेशन म्हणून ते पाहू शकता. जयपुर, उदयपुर, जोधपुर आणि जैसलमेर सारखी शहरं फिरण्यासाठी खूप सुंदर आहेत.
गोवा : पर्यटनासाठी गोवा हा देखील उत्तम प्लॅन आहे. नारळी-पोफळीच्या बागा आणि पोर्तुगालीन इमारती पाहण्यासारख्या आहेत. कमी बजेटमध्ये गोवा फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. बाईकवरून फिरणं म्हणजे स्वर्गाहून सुख असल्याची भावना येते.
केरळ : मान्सूनमध्ये केरळ फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. दाट धुकं आणि रस्त्यावरून बाईक राईड केरळमध्ये फायद्याचं आहे. पावसात केरळ फिरण्यासाठी लांबून पर्यटक येतात.
कुर्ग : कर्नाटकात उंचावरून कोसळणारे धबधबे हे आकर्षणाचं केंद्र आहे. दक्षिण-पश्चिम भागात कुर्ग परिसर पाहण्यासारखा आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारण 900 मीटर 1715 मीटर उंचीवर आहे. इथे एलीफंट कॅम्प, कावेरी, कुक्के सुब्रेमण्यम कासरगोडा अशी बरीच ठिकाणं फिरण्यासारखी आहेत.
लडाख : लडाख पर्यटकांचं नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. तिथलं सौंदर्य लोकांना आपल्याकडे खेचून घेतं. पावसाळ्यात तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा ग्रूप काही वेगळाच असतो. डोंगरावरून पाहिलेलं अनोखं सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडणारं असतं.
मेघालय : डोंगरांमधून वाहणाऱ्या नद्या आणि झरे, उंच पर्वत रांगा आणि हिरवळ तिथला नजारा नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे. पावसात इथे जाणं म्हणजे सोन्याहून पिवळ म्हणतात तसाच प्रकार आहे.
दार्जिलिंग - चहाच्या मळ्यांनी वेढलेले दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान पहाटेच्या वेळी डोंगरावर धुकं असतं. भिजवलेल्या चहाच्या पानांचा सुगंध हवेत सगळीकडे पसरत असतो. दार्जिलिंगच्या मॉल रोडवर थंड वारा आणि पावसाच्या थेंबांमध्ये घेतलेला गरम गरम चहा एक वेगळाच अनुभव देणारा आहे.
पाँडिचेरी- पाँडिचेरीमध्ये पावसाळा घालवणे म्हणजे फ्रेंच रिव्हिएराला भेट देण्यासारखं सुखं आहे. या शहरात पावसाळ्यात वारंवार पाऊस पडतो. इथे सुंदर समुद्र किनाऱ्यावर काही वेळ घालवल्यास तुम्हाला खूप आनंददायी वाटेल.
तळकोकण : कोकणात पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर जाता येत नसलं तरी कोकणात नुसतं रस्त्यावरून फिरणं देखील सुख असतं. हिरवी गार झाडं आणि धबधबे यामुळे कोकणचं सौंदर्य जास्त खुलून दिसतं.
माजुली : आसामच्या जोरहाट जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी नदी पाहण्यासारखी आहे. माजुली हे शतकानुशतके सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. जर तुम्हाला अशी ठिकाणे पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही पावसाळ्यात तिथलं सौंदर्य पाहायला जाऊ शकता.