नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जळजळीत शब्दांत टीका केली. बुलंदशहर हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि आंदोलकांच्या जमावातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र, निपुत्रिक मोदींना एखाद्या कुटुंबातील मुलगा गेल्याचे दु:ख काय कळणार, अशी टीका चंद्रशेखर यांनी केली. मोदींचे अर्धे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री निपुत्रिकच आहेत. त्यामुळे हिंसाचारात मुलगा, पती, भाऊ किंवा कर्ता पुरूष गमावलेल्या कुटुंबीयांचे दु:ख त्यांना कधीच कळणार नाही, असे चंद्रशेखर यांनी म्हटले.
तसेच गोमांसाच्या मुद्द्यावरून वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी केली. जर गोहत्येच्या संशयातून अशा घटना घडणार असतील तर गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करायला पाहिजे आणि तिच्या हत्येवर भारतात बंदी आणली पाहिजे. मात्र, सरकार गोमांस निर्यात करणाऱ्यांना अनुदान देऊन स्वत:चे खिसे भरत असल्याचा आरोपही यावेळी चंद्रशेखर यांनी केला.
बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोहत्येच्या संशयावरुन मोठा हिंसाचार झाला होता. जवळपास ४०० आंदोलकांनी एक पोलीस ठाणे पेटवून दिले होते. हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह आणि एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटका झाली होती. सहारनपूर दंगलीप्रकरणी ते जवळपास वर्षभर जेलमध्ये होते.