आसाम : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेली हिंसक झडप आणि नेपाळच्या वृत्तीनंतर भारताच्या आणखी एका शेजारील देशाने चाल चालण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूतानकडून (Bhutan) आसाममधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी रोखण्यात आलं आहे.
बक्सा जिल्ह्यातील 26 हून अधिक गावांमधील सुमारे 6000 शेतकरी सिंचनासाठी मानवनिर्मित सिंचन जलवाहिनी डोंग प्रकल्पांवर अवलंबून आहेत. 1953 नंतर स्थानिक शेतकरी, शेतीसाठी भूतानमधून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करतात.
भूतान सरकारने, अचानक कोणतंही कारण न सांगता सिंचन वाहिनी बंद केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. कालीपूर-बोगाजुली-कलानदी अंचलिक डोंग धरण समितीच्या बॅनरखाली शेतकर्यांनी सोमवारी निदर्शनं केली. आणि केंद्र सरकारने भूतानसमोर त्यांचा हा प्रश्न उपस्थित करुन लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.
या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे, भूतान सरकारमधील अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी, डोंगपर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या प्रवेशावर रोख लावण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
धरण समितीच्या एका सदस्याने, 'गेल्या पाच दिवसांपासून भात शेतात पाणी जात नाही. आम्हाला पाण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात आम्ही आपलं आंदोलन आणखी तीव्र करु, असं सांगितलं आहे. कोरोना व्हायरस एक वेगळा मुद्दा आहे आणि जवळपास 70 वर्ष जुन्या प्रणालीवर रोख लावणं वेगळा मुद्दा आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल राखून आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी डोंगला चॅनेलाईज करु शकतो. भूतान सरकार इतर कारणं सांगून हे करु शकत नाही, असंही ते म्हणाले.