Heat Wave : देशात एकीकडे मान्सूनचं आगमन झालेलं असताना बिहारमध्ये उष्णतेची प्रचंड मोठी लाट (Bihar weather) आली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बिहारमधील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या उन्हामुळे उष्माघातामुळे बळी पडल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. एकट्या भोजपूरमध्ये उष्माघाताने (Heat stroke) सहा जणांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे रोहतासमध्ये पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यानच पतीचाही उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
गुरुवारी रोहतासमधील कारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभनी गावात पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या पतीचा उष्माघाताने मृत्यू झालाय. बाभणी येथील शंकर दयाळ पाठक यांच्या 65 वर्षीय पत्नी शोभा पाठक या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. कुटुंबीय आणि पती शंकरदयाल पाठक अंत्ययात्रेसह अंत्यसंस्कारासाठी बक्सरला पोहोचले होते.
कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे शंकर दयाळ यांना स्मशानभूमीत उन्हाचा झळा बसल्या होत्या. त्यानंतर त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना पाटण्यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र भोजपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूर बाजारपेठेत पीएमसीएचमध्ये नेत असतानाच शंकर दयाळ यांचा मृत्यू झाला. ते आपल्या पत्नीला अग्नीही देऊ शकले नाहीत. त्यानंतर शंकरदयाळ यांच्या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले.
दुसरीकडे शंकरदयाल यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याने स्मशानभूमीत असलेल्या कुटुंबीय आणि नातेवाइकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते. मात्र शंकरदयाल पाठक यांच्या निधनाची बातमी कळताच सगळ्या गावात शोककळा पसरली.
बिहारमध्ये उष्माघाताच्या तक्रारीही रूग्णालयात वाढत आहेत. भोजपूरमध्ये गुरुवारी 4 वृद्ध आणि दोन तरुणांचा मृत्यू झाला. उष्माघाताने मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्याचबरोबर उष्माघाताची लक्षणेही डॉक्टरांनी सांगितली आहेत. तर येथे, सासाराम जिल्हा मुख्यालयात तैनात असलेल्या दोन जवानांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दोन्ही जवान न्यायालयाच्या गेटवर तैनात होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी सासाराम सदर रुग्णालयात नेले होते मात्र सायंकाळी उशिरा दोघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, गुरुवारी पहिल्यांदाच अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुढील तीन ते चार दिवस पुढे सरकण्याची शक्यता आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये पारा 41 च्या पुढे गेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत राज्याच्या दक्षिण आणि मध्य बिहारमध्ये 20 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.