Tata Bisleri Deal : भारतातील सर्वात लोकप्रिय बाटली बंद पाण्याची कंपनी बिस्लेरी (bisleri) आता विकली जाणार आहे. 7,000 कोटी रुपयांना टाटा समूह बिस्लेरी विकत घेणार आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी नेस्ले आणि रिलायन्ससारख्या कंपन्याही रांगेत होत्या. पण, बिस्लेरीचे मालक रमेश चौहान (ramesh chauhan) यांनी आपली कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकडे (Tata Consumer) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी विकत घेण्यासाठी बिस्लेरीची टाटा कंझ्युमरसोबत सुमारे 2 वर्षांपासून चर्चा सुरू होती.बिस्लेरीला पुढील स्तरावर नेण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचे ठरवले आहे. रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान (jayanti chauhan) यांना व्यवसायात फारसा रस नसल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. (Story of Bisleri coming to India)
बिस्लेरी कंपनी रमेश चौहान यांनी 1969 मध्ये सुमारे पाच लाख रुपयांना विकत घेतली होती आणि आज ती 7000 कोटींना विकली जाणार असल्याची चर्चा आहे.
बिस्लेरी हे नाव त्यांच्या संस्थापकाकडून मिळाले. बिस्लेरी कंपनीची स्थापना 20 नोव्हेंबर 1851 रोजी सिग्नर फेलिस बिस्लेरी (signor felice bisleri) या इटालियन व्यावसायिकाने केली होती. सिग्नर फेलिस एक व्यावसायिक तसेच रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी इटलीतील नोसेरा उंब्रा नावाच्या गावात बिस्लेरी कंपनी सुरू केली होती. त्यावेळी बिस्लेरीमध्ये एंजेलिका झऱ्याचे पाणी आणि विविध औषधी वनस्पती आणि लोह क्षार घालून तयार केले गेले होते. सिग्नर फेलिसने मद्यपान सोडवण्यासाठी उपाय म्हणून बिस्लेरीच्या उत्पादनाची सुरूवात केली होती.
सिग्नर फेलिस यांच्या मृत्यूनंतर, कंपनीचा ताबा त्यांचे कौटुंबिक डॉक्टर डॉ. सेझेर रॉसी यांनी घेतला. डॉ. रॉसी आपला वकील मित्र खुशरू सुनटूक याच्यासोबत पाणी विकण्याच्या उद्देशाने भारतात पोहोचले. त्यांनी रॉसी आणि सनटूक यांनी 1965 मध्ये ठाण्यात बिस्लेरीचा पहिला वॉटर प्लांट उभारला. सुरुवातीला बिस्लेरीने मिनरल वॉटर आणि सोडा विकणारी कंपनी म्हणून जाहिरात करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये आपले स्थान निर्माण केले. पण मोठं यश मिळवण्यासाठी ही पाण्याची बाटली भारतातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते.
मात्र दोघांना हवे तेवढे यश न मिळाल्याने कंपनी विकण्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पार्ले नावाची कंपनीही हळूहळू आपली व्याप्ती वाढवत होती. पार्लेचे संस्थापक जयंतीलाल चौहान यांचे पुत्र रमेश चौहान यांना बिस्लेरीच्या विक्रीची बातमी कळताच त्यांनी 1969 मध्ये ही कंपनी पाच लाख रुपयांना विकत घेतली.
सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने फक्त पाच रुपयांमध्ये 500 मिलीलीटरची छोटी बाटली बाजारात आणली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रस्त्याच्या कडेला असलेली छोटी दुकाने इत्यादी ठिकाणी पाण्याच्या बाटल्या उपलब्ध होतील याची कंपनीने नेहमीच काळजी घेतली. यानंतर बिस्लेरीचा देशभर विस्तार झाला. आजही मिनरल ड्रिंकिंग वॉटर उद्योगाचा 60 टक्के बाजारातील हिस्सा हा बिस्लेरीचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात, बिस्लेरीची उलाढाल 1,181.7 कोटी रुपये होती, ज्यामध्ये 95 कोटी रुपयांचा नफा होता.