#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

Shubhangi Palve Updated: Mar 30, 2018, 12:15 PM IST
#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम  title=

बंगळुरू : 'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.

भाजपची मोहीम

२९ मार्चला हेगडेच्या अटकेनंतर भाजप नेते प्रताप सिन्हा यांनी काँग्रेस सरकारवर टीका केलीय. तर कौशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी 'सिद्धरामय्या सरकारला लाज वाटायला हवी. महेश हेगडेच्या अटकेमागे त्यांचाच हात आहे. आमच्यासोबत लढताना असे पळपुट्या वाटा शोधण्यापेक्षा खऱ्या लोकशाहीनं लढा' असं ट्विटरवर म्हटलंय. भाजपकडून #ReleaseMaheshHegde हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन्ड करण्यात येतोय. 

कर्नाटकमध्ये निवडणुकीचे पडघम

कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशावेळी चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून दोन समुदायांमध्ये तणाव वाढवण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

मोदी करतात 'फॉलो'

उल्लेखनीय म्हणजे, हेगडे याच्यावर पहिल्यांदाच 'फेक न्यूज'चा आरोप झालेला नाही. यापूर्वीही त्यांच्यावर गांधी-नेहरू कुटुंबीयांविरुद्ध वादग्रस्त बातम्या प्रसिद्ध करण्यावरून टीका झाली होती. सोशल मीडियावर ट्विटरवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेते हेगडेंना फॉलो करतात.

काय आहे प्रकरण?

बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय. ११ मार्च रोजी 'पोस्टकार्ड न्यूज' वेबसाईटवर एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत एक जैन मुनी श्री. उपाध्याय मयंक सागरजी महाराज यांच्यावर एका मुस्लिम व्यक्तीनं हल्ला केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र जैन मुनी एका रस्ते अपघातात किरकोळ जखमी झाले होते. एका बाईकनं त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली होती. 

महेश विक्रम हेगडे यांनी जखमी जैन मुनीचा फोटो पोस्ट करत लिहिलं होतं 'सिद्धरामय्या सरकारमध्ये कुणीही सुरक्षित नाही'. हा जखमी जैन मुनीचा फोटो हजारो लोकांनी शेअर केला होता.

हेगडे न्यायालयीन कोठडीत

'फेक न्यूज' प्रसिद्ध केल्याप्रकरणी महेश हेगडेवर पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हेगडे यांच्यावर आयपीसी कलम १५३-ए (दंगा भडकावण्याचा प्रयत्न), कलम ३४, कलम १२० (बी) आणि आयटी अॅक्ट कलम ६६ (फसवणूक) असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. सध्या कोर्टानं हेगडे यांना न्यायालयीन कोठडीत धाडलीय.