कोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी

कोची येथे शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 13, 2018, 01:39 PM IST
कोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी title=

कोची : येथील शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

 जहाज दुरूस्तीसाठी काम सुरु

स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोचीन शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतले असून बचावकार्य सुरू आहे. 

 दोघांची ओळख पटली 

दरम्यान, दोन कामगार त्या टाकीत असल्याचे वृत्त आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत.

आग आटोक्यात

आज महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड आज बंद आहे. मात्र, दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरु आहेत. नौदलाचे अग्निशामक दलही घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात यश आलेय.