#BoycottBournvita : सोशल मीडियावर दर दिवशी काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो पाहून अनेक पालकांना आणि त्याहूनही अनेक मातांना धडकी भरली. कारण, Health Drink च्या नावाखाली विक्री होणारा एक असा पदार्थ त्या आपल्या मुलांना देत आहेत ज्यामुळं त्यांना डायबिटीज अर्थात मधुमेहाचा धोका संभवतो. एका व्हिडीओतून सोशल मीडिया इंफ्लूएंसरनं हा दावा केला होता. यानंतर हे प्रकरण पेटलं आणि या इंफ्लूएंसरला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली.
इंफ्लूएंसरनं रेवंत हिमतसिंग्कानं (Revant Himatsingka instagram) काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यानं Cadbury या प्रसिद्ध चॉकलेट आणि तत्सम उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. Cadbury च्या Bournvita चं एक पाकिट हाती घेत त्यानं यामध्ये असणाऱ्या अनेक पदार्थांचा पाढा वाचला. nutritional value च्या नावाखाली बॉर्नविटाची विक्री करताना कंपनीकडून माहिती चुकीचा पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात असल्याचं तो व्हिडीओमध्ये म्हणाला होता.
बॉर्नविटामध्ये साखरेचं प्रमाण पाहता त्यानं या उत्पादनाच्या पाकिटावर असणारी माहिती अधोरेखित केली. साखरेसाठी वापरण्यात आलेलं पर्यायी नावही त्यानं इथं मांडलं आणि सर्वांच्याच नजरा वळल्या. बॉर्नविटाच्या टॅगलाईनचा उल्लेख करत इथं 'तय्यारी जीत की' ऐवजी 'तय्यारी डायबिटीज की' अशीच असायला हवी असा उपरोधिक सूरही त्यानं आळवला.
दरम्यान, इथं रेवंतचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिथं त्याच्या अडचणीही वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंच केलेली एक सोशल मीडिया पोस्ट याची प्रचिती देऊन गेली. जिथं त्यानं आपण बॉर्नविटासंबंधीचा व्हायरल होणारा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागे घेत असल्याचं त्यानं जाहीर केलं.
अपने बच्चों को चीनी खिलाना बंद करें।
#BoycottCadbury #BoycottBournvita #BoycottBournvita pic.twitter.com/cqlBISlOkB— Public News (@Aimoopo) April 18, 2023
देशातील बड्या कायदेशीर संस्थांकडून आपल्याला नोटीस आल्याचं त्यानं यावेळी स्पष्ट केलं. सोबतच Cadbury ची जाहीर माफी मागत कंपनीचा कोणताही हेतूचा अपमान करण्याचा आपला मनसुबा नसल्याचं त्यानं स्पष्ट करत आपल्याविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारू नये अशी विनंती केल्याचं पाहायला मिळालं.
इंफ्लूएंसरनं हा व्हिडीओ मागो घेत कंपनीची माफी मागितली खरी. पण, त्याचा हा व्हिडीओ आता इतर सोशल मीडिया हँडल्सवरून व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या नजरा वळवताना दिसत आहे. त्यातूनच आता अनेक युजर्सनी बॉर्नविटा या आणि तत्सम फसव्या जाहिराती करून सर्वसामान्यांचं लक्ष वेधणाऱ्या उत्पादनन निर्मात्या कंपन्यांविरोधातही सूर आळवला आहे.