Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: उत्तर प्रदेशमधील बाराबंकीचे भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना थेटपणे आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही अशा अर्थाचं विधान केलं आहे. 'माझं तिकीट कोण कापणार?' असा उलट प्रश्नच बृजभूषण यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विचारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृजभूषण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना बृजभूषण यांनी 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असं म्हटलं आहे. दरम्यान, दुसरीकडे मात्र बृजभूषण यांच्या अडचणी वाढण्याची चित्र दिसत आहेत. नवी दिल्लीमधील रोस एव्ह्यून्यू कोर्टामध्ये दिल्ली पोलिसांनी बृजभूषण हे महिलांचा छळ करण्याची एकही संधी सोडायचे नाहीत, असा खळबळजनक दावा केला आहे.
रविवारी एका क्रिकेट मालिकेचं उद्घाटन करण्यासाठी बाराबंकीमध्ये बृजभूषण आले होते. त्यावेळी एका पत्रकाराने बृजभूषण यांना, तुमचं तिकीट कापलं जाणार का? असा प्रश्न विचारला. सोशल मीडियावरील दाव्यांनुसार मागील बऱ्याच काळापासून वादात अडकलेल्या बृजभूषण यांना तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नावर प्रतिप्रश्न करत बृजभूषण यांनी माझं तिकीट कोण कापणार असं पत्रकारांना विचारलं. मला नाव सांगा फक्त. आणि माझं तिकीट कापता येत असेल तर कापून दाखवावे. "तुम्ही माझं तिकीट कापणार का?" असा प्रश्न बृजभूषण यांनी पत्रकारांना आरेरावीच्या स्वरात विचारला.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आऱोप केले आहेत. याचबरोबर इतरही अनेक प्रकरणांमध्ये बृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणावरुन नवी दिल्लीमधील राजकारण काही महिन्यांपूर्वी चांगलेच तापले होते. अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांच्यावर कुस्ती महासंघाने कारवाई करावी या मागणीसाठी जंतर-मंतर येथे अनेक आठवडे आंदोलन केलं होतं. कुस्तीपटू विनेश फोगाट, ऑलिंपिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी 23 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्लीत धरणं आंदोलन सुरू केलं होतं. यानंतर या आंदोलनाला भारतामधून अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळाला होता. या आंदोलनादरम्यान अगदी देशासाठी पटकावलेली पदकं गंगेत वाहून देण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत कुस्तीपटू आले होते. मात्र नंतर हे आंदोलन मोडून काढण्यात यंत्रणांना यश आलं.
आंदोलन मोडून काढण्यात यश आलं असलं तरी बृजभूषण सिंह विरुद्ध कुस्तीपटू हा न्यायालयीन संघर्ष अजूनही सुरु आहे. दरम्यान बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पुन्हा एकदा महिला कुस्तीपटूने त्यांनी बळजबरीने आपल्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता बृजभूषण यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असल्याची चर्चा आहे.