प्रेम प्रकरणातील वादातून तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे  

Updated: Jun 2, 2020, 01:29 PM IST
प्रेम प्रकरणातील वादातून तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले title=
प्रेम प्रकरणातील वादातून तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले

प्रतापगढ, उत्तर प्रदेश :  उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना आहे. प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार फतनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भुजैनी गावात घडला आहे. हा प्रकार घडल्यानंतर गावात दाखल झालेल्या पोलिसांना गावातील गुंडांनी अक्षरशः पिटाळून लावले. गावातील गुंडांनी पोलिसांची वाहनंही जाळून टाकली आणि पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले.

भुजैनी गावातील एका आंब्याच्या बागेत तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आणि गावात धुमश्चक्री सुरु झाली. जाळून हत्या झालेल्या तरुणाचे शेजारच्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही लग्न करण्याच्या विचारात होते, पण घरच्यांचा त्याला विरोध होता. गावातील ही तरुणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन कानपूरला गेली. त्यानंतर या तरुणाने तिच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तरुणाने तरुणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तरुणीचे वडील संतप्त झाले आणि तरुणाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. तरुणाला अटक करण्यात आली होती. पण कोरोना व्हायरसच्या साथीमुळे तो १ मे रोजी जामिनावर सुटून गावात आला होता.

दरम्यान, सोमवारी दुपारी हा तरुण घरातून निघाला, तो संध्याकाळपर्यंत घरी परतलाच नाही. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली, तेव्हा त्याचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या तरुणाचे हातपाय बांधून झाडाला बांधले आणि पेटवून देऊन जीवंत जाळले, अशी माहिती पुढे आली आहे. तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर गावात धुमश्चक्री सुरु झाली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते गावात दाखल झाले. पण गावकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार दगडफेक सुरु केली. गावकऱ्यांचा हल्ला इतका जबरदस्त होता की पोलिसांना गाड्या गावातच सोडून हवेत गोळीबार करत पळून जावे लागले. या दगडफेकीत तीन पोलीसही जखमी झाले. अखेर प्रयागराज विभागाचे आयजी आणि एडीजी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

 

परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजुच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे.