लखनऊ - उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांचा मृत्यू झाला. यावरून माजी सरकारी अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार आदित्यनाथ यांच्या बचावासाठी धावून आले आहेत. अनूपशहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय शर्मा यांनी नवे विधान करून लक्ष वेधून घेतले आहे. माजी नोकरशहांवर टीका करताना संजय शर्मा म्हणाले की, त्यांना फक्त दोन माणसांच्या मृत्यूचे पडले आहे २१ गायींच्या मृत्यूचे काहीच नाही.
बुलंदशहरात ३ डिसेंबरला घडलेली घटना योग्य पद्धतीने हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप जवळपास ८३ माजी नोकरशहांनी केला होता. या संदर्भात त्यांनी एक खुले पत्र लिहिले असून, केंद्र सरकारलाही ते पाठविण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. यावरूनच संजय शर्मा यांनी या नोकरशहांविरोधात भूमिका घेतली. त्यांनीही एक खुले पत्र लिहिले आहे. ते म्हणतात, आता तुम्ही बुलंदशहरातील घटनेवरून चिंतित आहात. तुम्हाला फक्त सुमित आणि कामावर हजर असलेले पोलिस अधिकारी यांचाच मृ्त्यू दिसतो. पण तुम्हाला हे दिसत नाही की तिथे २१ गायीसुद्धा मेल्या आहेत.
समाजामध्ये फूट पाडणाऱ्या राजकारणाविरुद्ध उत्तर प्रदेशातील नागरिकांनी एकत्र आले पाहिजे, अशी मागणी माजी नोकरशहांनी त्यांच्या पत्रामध्ये केली आहे. या राजकारणातून आपल्या घटनेच्या मूलभूत सिद्धांतांनाच धक्का लावला जात आहे. याबद्दल गेल्या १८ महिन्यांत आम्ही नऊ वेळा आमचा मुद्दा मांडला आहे. या पत्रावर माजी विदेश सचिव श्याम शरण, सुजाता सिंह, सामाजिक कार्यकर्ते अरुणा राय, हर्ष मंदर, दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग, प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार, योजना आयोगाचे माजी सचिव एन. सी. सक्सेना आदींचा समावेश आहे.