लॉकडाऊनमध्ये झोमॅटो करणार दारूची होम डिलीवरी

दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला

Updated: May 7, 2020, 07:13 PM IST
लॉकडाऊनमध्ये झोमॅटो करणार दारूची होम डिलीवरी title=

मुंबई : देशभरात दारूची वाढती मागणी पाहून फूड डिलीवरी करणाऱ्या झोमॅटो ऍपने भारतात दारूची होम डिलिवरी करण्याची तयारी दाखवली आहे. लॉकडाऊननंतर झोमॅटोने भारतात ग्रोसरी डिलिवरी करण्यास सुरूवात केली. 

भारतात २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर झाला. देशात यानंतर दारूची दुकाने बंद करण्यात आली. या आठवड्यात दारूविक्रीला परवानगी देण्यात आली. दारू खरेदीसाठी लोकांनी सोमवारी दुकानांबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळण्यात आले तर काहींने हे नियम धाब्यावर बसवले. 

दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला. दिल्ली सरकारने दारूवर ७०% टॅक्स घेण्याचा निर्णय घेतला. तर काही राज्यांमध्ये दारूची दुकाने उघडण्याकरता मर्यादीत वेळ ठरवण्यात आली. 

यावेळेत दारूची होम डिलिवरी करण्यावर काही बंधन नाहीत. ISWAI ने सरकारकडे मागणी केली आहे की, दारूची डिलिवरी करण्याची परवानगी द्यावी. जर सरकार यासाठी परवानगी देत असेल तर झोमॅटो फूडसोबतच दारूची देखील होम डिलिवरी सुरू करणार आहे. 

झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार,'जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारूची होम डिलिवरी करण्यात आली. तर दारूला चांगली मागणी मिळेल.' तसेच झोमॅटोनो ग्रीन आणि ऑरेंज विभागातच दारूची होम डिलिवरी करण्याची तयारी दर्शवली आहे.