मुंबई : सीबीएसईने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं आहे की, इयत्ता 12 वी समाजशास्त्र बोर्ड परीक्षेच्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न हा चुकीचा आणि अन्यायकारक आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या CBSE टर्म-1 च्या परीक्षा सुरू आहेत. बुधवारी सीबीएसईची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सीबीएसईने ट्वीट केले आहे. त्यानंतर आणखीनच गोंधळ उडाला आहे.
वास्तविक, सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांना गुजरात दंगलीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. MCQ-आधारित या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, '2002 मध्ये गुजरातमध्ये अभूतपूर्व प्रमाणात आणि मुस्लिमविरोधी हिंसाचार कोणत्या सरकारमध्ये झाला?'. यासाठी विद्यार्थ्यांना चार पर्याय देण्यात आले होते. काँग्रेस, भाजप, लोकशाही आणि रिपब्लिकन हे पर्याय त्यामध्ये होते.
अनेकांनी सीबीएसई परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याबाबत काहींनी नाराजीही व्यक्त केली. हा गोंधळ पाहून सीबीएसईने ट्विट करून एक निवेदन जारी केले आणि जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
बोर्डाने ट्विट केले की, "वर्ग-12वीच्या समाजशास्त्र टर्म-1 परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला आहे जो अयोग्य आहे. हे सीबीएसईच्या बाह्य विषय तज्ञांकडून प्रश्नपत्रिका सेट करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे." सीबीएसईने ही चूक मान्य केली आहे आणि ते दोषींवर कठोर कारवाई करतील असे देखील आश्वासन दिलं आहे.
दुसर्या ट्विटमध्ये, सीबीएसईने म्हटले आहे की, "पेपरांसाठी सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे सांगतात की, हे ठरवलं पाहिजे की प्रश्न केवळ शैक्षणिक असावेत. अशा विषयाला स्पर्श केला जाऊ नये, ज्यामुळे सामाजिक आणि राजकीय निवडींवर आधारित लोकांच्या भावना दुखावतील."
खरेतर 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांना जाळपोळ झाली होती, त्यानंतर राज्यात दंगली उसळल्या होत्या. दोन्ही घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.