Chandrayaan-3 Mission 100 Not Out: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच 'इस्रो'च्या आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील लॉन्च पॅडवरुन आदित्य एल-1 ही विशेष ऑर्बिटर मोहीम सूर्याच्या दिशेनं आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी झेपावली. आज भारतीयांचं लक्ष लागून राहिलेल्या या अंतराळ मोहिमेबरोबरच भारत-पाकिस्तान सामनाही चर्चेत आहे. भारताचं ही सूर्य मोहीम यशस्वीपणे झेपावल्यानंतर दीड तासाने 'इस्रो'नं थेट चंद्रावर शतक लगावण्यात आल्याचं जाहीर केलं. केवळ घोषणाच नाही तर 'इस्रो'नं क्रिकेटमधील एक वॅगनवीलचा फोटोही शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या नावाने असलेल्या व्हेरिफाइड अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
'इस्रो'नं 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) दुपारी 1 वाजून 29 मिनिटांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चांद्रयान-3 मोहिमेसंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. प्रज्ञानने नाबाद शतक झळकावलं आहे असं 'इस्रो'नं जाहीर केलं आहे. "दरम्यान, चंद्रावर प्रज्ञाननं 100 मीटर्सहून अधिक प्रवास केला असून हा प्रवास अजून सुरुच आहे," अशा कॅप्शनसहीत 'इस्रो'नं एक फोटो शेअर केला आहे. क्रिकेटमध्ये चौकार षटकार दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे वॅगनविल दाखवलं जातं त्याप्रमाणे गोलाकार आकारामध्ये चांद्रयान-3 चं विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरलं तेथील 'शिव शक्ती पॉइण्ट'पासून प्रज्ञान रोव्हर कोणकोणत्या ठिकाणी आणि कसं फिरलं हे दाखवण्यात आलं आहे. प्रज्ञानने एकूण 101.4 मीटर अंतराचा प्रवास केला आहे.
Meanwhile, over the Moon, Pragan Rover has traversed over 100 meters and continuing. pic.twitter.com/J1jR3rP6CZ
— ISRO (@isro) September 2, 2023
'इस्रो'नं शेअर केलेल्या या पोस्टवर सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने असलेल्या फॅन अकाऊंटवरुन कमेंट करण्यात आली आहे. 'इस्रो' लिहून एक हार्ट इमोजी अशी कमेंट केली आहे.
भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडींग केलेला पहिला देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सध्या दिवस सुरु आहे. पृथ्वीवरील 24 तासांच्या दिवसाच्या हिशोबाने सांगायचं झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 15 दिवस उजेड असतो तर 15 दिवस अंधार असतो. भारताचं विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तेव्हा तिथे पुढील 15 दिवस उजेड असणार आहे. याच 15 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन वेगवेगळे प्रयोग करणार आहे. आतापर्यंतच्या प्रयोगामध्ये चंद्रावर सल्फर, ऑक्सिजनबरोबर अन्य खनिजांचे अंश सापडले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार असेल तेव्हा तापमान उणे 100 पेक्षाही कमी असेल. त्या कालावधीमध्ये प्रज्ञान रोव्हर पुन्हा विक्रम लँडरमध्ये असेल.