'हा आमचा चांद्रयान अन् ही त्याची बहिण चांदनी'; जुळे भाऊ-बहिण जन्मापासूनच चर्चेत

Chandrayaan 3 successful Landing Twins Named: देशातील 140 कोटी जनता चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरावं यासाठी प्रार्थना करत होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि इतिहास रचला गेला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 11:50 AM IST
'हा आमचा चांद्रयान अन् ही त्याची बहिण चांदनी'; जुळे भाऊ-बहिण जन्मापासूनच चर्चेत title=
23 ऑगस्ट रोजी या बाळांचा जन्म झाला

Chandrayaan 3 successful Landing Twins Named: 23 ऑगस्ट 2023 म्हणजेच बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. याच ऐतिहासिक क्षणाला उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जिल्हा रुग्मालयामध्ये 7 बाळांचा जन्म झाला. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी लँडिंगचा आनंद झालेल्या पालकांनी आपल्या मुलांची नावं चांद्रयानाशी संबंधित ठेवली आहेत. कोणी आपल्या मुलाचं नाव चांद्रयान ठेवलं आहे तर कोणी घरी आलेल्या लक्ष्मीचं नाव चांदनी असं ठेवलं आहे.

...म्हणून मुलीचं नाव चांदनी ठेवलं

गोरखपूर जिल्ह्यातील महिला चिकित्सायलाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार 23 ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जन्म झालेल्या बाळांच्या पालकांनी आपल्या मुलांची नावं या मोहिमेशी संलग्न अशी ठेवली आहेत. हा क्षण आयुष्यभर लक्षात रहावा तसेच देशाबद्दल या मुलांना कायम प्रेम वाटत रहावं या हेतूने पालकांनी आपल्या मुलांना चांद्रयान-3 मोहिमेशी संबंधित नावं दिल्याचं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. 23 ऑगस्टला कन्यारत्न प्राप्ती झालेल्या एका वडिलांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना, ज्यावेळेस आमच्या मुलीने पृथ्वीवर जन्म घेतला त्याचवेळी चांद्रयान-3 चंद्रावर उतरलं. त्यामुळेच आम्ही आमच्या मुलीचं नाव चांदनी ठेवलं आहे, अशी माहिती दिली.

जुळ्यांची नावं चांद्रयान आणि चांदनी

याच रुग्णालयामध्ये एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. त्यापैकी एक मुलगा असून दुसरी मुलगी आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा क्षणी जन्माला आलेल्या आमच्या मुलांचं नाव चांद्रयान-3 मोहिमेशीसंबंधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या महिलेच्या पतीनं दिली. या जुळ्या बाळांपैकी मुलाचं नाव चांद्रयान तर मुलीचं नाव चांदनी ठेवण्यात आलं आहे. 

4 वर्ष हजारो वैज्ञानिकांनी चांद्रयान-3 मोहिमेसाठी घेतली मेहनत

चांद्रयान-3 45 दिवसांचा प्रवास करुन 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानातील विक्रम लॅडर उतरला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. यापूर्वी चंद्रावर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवलं आहे. मात्र हे तिन्ही देश चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरले आहेत. पुढील 14 दिवस चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर वेगवेगळे प्रयोग करणार आहे. यामध्ये चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्यापासून ते फोटो काढण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. 16500 वैज्ञानिकांनी मागील 4 वर्षांमध्ये चांद्रयान-3 मोहिमेसाठी या ना त्या माध्यमातून काम केलं आहे. भारताने चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवल्यानंतर जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.