नवी दिल्ली: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणाला मंगळवारी वेगळेच वळण लागले. संबंधित महिलेने आपल्याला न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे सांगत चौकशीतून माघार घेतली. तसेच आपण यापुढे इन-हाऊस चौकशीसाठी समितीपुढे हजर राहणार नसल्याचेही या महिलेने स्पष्ट केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, इंदिरा बॅनर्जी आणि इंदू मल्होत्रा या त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, संबंधित महिलेने चौकशीसाठी हजर न राहण्याची भूमिका घेतल्याने नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.
या महिलेने एक पत्रक प्रसिद्ध करून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकामध्ये चौकशीतून माघार घेण्याची चार प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत. या चौकशीदरम्यान आपल्या वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. तसेच या चौकशीचे कोणतेही ऑडिओ किंवा व्हीडिओ चित्रीकरण होणार नाही. याशिवाय, या चौकशीदरम्यान महिलेने दिलेल्या जबाबाची प्रतही महिलेला देण्यात येणार नसून चौकशी प्रक्रियेबद्दलही कोणतीही माहिती नसल्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
याशिवाय, चौकशी समिती माझ्या तक्रारीकडे लैंगिक छळाच्या दृष्टीकोनातून न बघता अत्यंत सामान्य पद्धतीने बघत आहे. एकप्रकारे अशी परिस्थिती निर्माण करुन मला चौकशीतून बाहेर पडण्यासाठी उद्युक्त करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची न्याय आणि समानतेने चौकशी होण्याची गरज महिलेने व्यक्त केली. परिणामी मी चौकशीतून माघार घेत असल्याचे या महिलेने स्पष्ट केले.