हंदवाडा चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ

घरात आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. 

Updated: May 3, 2020, 11:12 AM IST
हंदवाडा चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ title=

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात शनिवारी रात्री दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २१ राष्ट्रीय रायफल्सचे चार जवान शहीद झाले. हंदवाडा येथील एका घरात दहशतवादी लपून बसले होते. घरातील लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. त्यांची सुटका करायला राष्ट्रीय रायफसल्चे चार जवान आणि एक पोलीस अधिकारी जीवावर उदार होऊन घरात शिरले. मात्र, घरात आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पराक्रमाची शर्थ करत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात २१ व्या राष्ट्रीय रायफल्सचे चारही जवान धारातीर्थी पडले. 

या तुकडीचे नेतृत्व करत असलेले कर्नल आशुतोष शर्मा हे दहशतवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जात होते. यापूर्वी त्यांनी जोखीम असलेल्या अनेक दहशतवादी कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. यासाठी कर्नल आशुतोष शर्मा यांना दोनदा शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले होते.

काश्मीरमध्ये ओलिसांची सुटका करताना चार भारतीय जवान शहीद 

गेल्या पाच वर्षांत कर्नल किंवा कमांडिंग ऑफिसर पदावरील अधिकारी दहशतवादी चकमकीत धारातीर्थी पडण्याही ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये कर्नल एम.एन. रॉय तर नोव्हेंबर २०१५मध्ये कर्नल संतोष महाडिक हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. 

यानंतर आता कर्नल आशुतोष शर्मा यांच्या रुपाने भारतीय सैन्याने आणखी एक वीर गमावला आहे. कर्नल आशुतोष शर्मा हे गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात कार्यरत होते. यादरम्यान त्यांना दोनवेळा शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले होते. 

यापैकी एकदा कपड्यांच्या आतमध्ये स्फोटके लपवलेला दहशतवादी जवानांवर चाल करुन येत होता. त्यावेळी आशुतोष शर्मा यांनी वेळीच धोका ओळखत चपळतेने या दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केले होते. यामुळे त्यांच्या तुकडीतील अनेक जवानांचा जीव थोडक्यात वाचला होता. दरम्यान, हंदवाडा चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासोबत मेजर अनुज सुद, नायक राजेश, लान्स नायक दिनेश यांनाही वीरमरण आले.