'कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत'

आता पडद्यामागे सुरु असलेल्या या वाटाघाटींना यश मिळून पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना सोडेल, ही आशा आम्हाला आहे. 

Updated: May 3, 2020, 10:21 AM IST
'कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत' title=

नवी दिल्ली: भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन एका परिसंवादात याबाबत भाष्य केले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल जातीने याप्रकरणात लक्ष घालत आहेत. मध्यंतरी त्यांनी यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजुआ यांच्याशीही चर्चा केली होती. या चर्चेत दोवाल यांनी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, असे सुचवल्याची माहिती 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिली आहे.

त्यामुळे आता पडद्यामागे सुरु असलेल्या या वाटाघाटींना यश मिळून पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना सोडेल, ही आशा आम्हाला आहे. पाकिस्तान माणुसकीच्या किंवा अन्य कोणत्याही दृष्टीकोनातून त्यांची सुटका करत असेल तर ते आम्हाला हवे आहे. त्यामुळेच भारताकडून कुलभूषण जाधव यांची सुटका करा, असे पाकिस्तानला सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, या सगळ्यात पाकिस्तानचा अहंकार आडवा येत असल्याचे साळवे यांनी सांगितले. 
पाकिस्तानने ३ मार्च २०१६ रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना ताब्यात घेतले होते. २५ मार्चला भारताला याबाबत कळवण्यात आले. यानंतर भारताने तात्काळ कुलभूषण जाधव यांच्या कॉन्स्युलर एक्सेससाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, पाकिस्तानने भारताला बराच काळ ताटकळत ठेवले.

यादरम्यान एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने मे २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. गेल्यावर्षी जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर निकाल देताना कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे आदेश दिले होते. तसेच कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर एक्सेस देण्याचे निर्देशही देण्यात आले होते. 
मात्र, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे आता पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची वेळ आल्याचे साळवे यांनी सांगितले.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, आरोपपत्र किंवा लष्करी न्यायालयाचा आदेशाची प्रत यापैकी कोणतीही गोष्ट अजूनपर्यंत जगासमोर ठेवलेली नाही. आम्ही पाकिस्तानला सातत्याने कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध काय पुरावे आहेत, हे सादर करण्याची मागणी करत आहोत. मात्र, पाकिस्तानने कायम नकार दिला. पाकिस्तानी कोर्टात कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावण्यासाठी हे पुरावे ग्राह्य असतील. मात्र, या प्रकरणाची योग्यपणे सुनावणी झाल्यास पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांच्या सोडण्यावाचून पर्याय उरणार नाही, असेही साळवे यांनी सांगितले.