गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, भाजपच्या कसोटीचा काळ

गोव्यातल्या राजकीय हालचालींना कमालीचा वेग

Updated: Sep 17, 2018, 03:19 PM IST
गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, भाजपच्या कसोटीचा काळ title=

पणजी : गोव्यातल्या राजकीय हालचालींना आज कमालीचा वेग आला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी आज राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सरकार बरखास्त करा अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे. सत्तास्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणुका पुन्हा नकोत, सरकार स्थापनेनंतर बहुमत सिद्ध करू असं देखील काँग्रेसने म्हटलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसने सत्ता स्थापनेची स्वप्नं बघू नये, गोव्यात सरकराला धोका नसल्याचं केंद्रीय निरीक्षक रामलाल यांनी म्हटलं आहे. आज गोवा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पणजी येथे पार पडली. त्यानंतर रामलाल यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाल्यावर गोव्यातील नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण तसा कुठलाही विचार तूर्तास नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी कालच स्पष्ट केलं आहे. आज सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आटोपून निरीक्षक दिल्लीला रवाना झाले आहेत.

गोव्यात तूर्तास नेतृत्वबदल होणार नाही अशी स्थिती आहे. मात्र गोव्यात भाजपच्या कसोटीचा काळ आहे. भविष्यात मुख्यमंत्री बदलल्यास बहुमत सिद्ध करणं हे मोठं आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह आणखी दोन मंत्री आजारी आहेत. तसंच सभापती प्रमोद सावंत यांना मतदान करता येणार नसल्याने भाजपचं विधानसभेतलं संख्याबळ १४ ऐवजी १० असं मर्यादीत झालं आहे. त्यातच पर्रीकर हेच मुख्यमंत्री राहावेत या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा फॉर्वर्ड आणि अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपने दुसऱ्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्यास सरकार कोसळण्याची भीती आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी २१ आमदार आवश्यक आहेत.