Kaali Controversial Poster: दक्षिण भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी 'काली' नावाचा माहितीपट बनवला आहे. या माहितीपटाच्या पोस्टरमधील देवी कालीच्या रुपावरून वाद निर्माण झाला आहे. माहितीपटाच्या पोस्टरमध्ये देवी कालीच्या रूपात दाखवलेली एक महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या महिलेच्या एका हातात एलजीबीटीक्यू प्लस समुदायाचा झेंडाही आहे. 2 जुलै रोजी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी 'काली'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. कॅनडा फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये हा माहितीपट लाँच करण्यात आला आहे. आता माहितीपटाच्या पोस्टरवरून नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
लीना मणिमेकलाई यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. पोस्टरमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लीना यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच #arrestleenamanimekalai ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
दुसरीकडे, 'काली' या माहितीपटावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार महुआ मोइत्रा यांनी देवी कालीला मद्य आणि मास स्वीकारणारी देवी म्हणून वर्णन केले होते. आता महुआ मोईत्राविरुद्ध भोपाळच्या गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 295 अ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.