देशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 9 सल्ले

 संयुक्त पत्र लिहून कोरोनाचा सामना करण्याचे मार्ग सुचवले 

Updated: May 13, 2021, 09:03 AM IST
देशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 9 सल्ले

नवी दिल्ली : देशातील 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहून कोरोनाचा सामना करण्याचे मार्ग सुचवले आहेत. देशभरात लसीकरण मोफत करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. त्याशिवाय सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प स्थगित करण्याची मागणीही केलीय. 

या 12 नेत्यांमध्ये सोनिया गांधी, एचडी देवगौडा, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, एमके स्टालिन, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डी राजा, फारूक अब्दुल्ला यांचा समावेश आहे. 

अन्य मागण्यांमध्ये सर्व बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये द्यावे, गरजूंना मोफत धान्य दिले जावे, अशी महत्त्वाची मागणी या पत्रात केलीय. यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनातील सद्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पत्र लिहून सहा सूचना केल्या आहेत. 

यात सर्वपक्षीय बैठकी बोलावून कोरोनाशी लढा देण्यासाठी एक ब्लू प्रिंट तयार करावं अन तातडीने कोरोना लसीसाठी बजेटमध्ये देण्यात आलेली ३५ हजार कोटी रूपये जारी करावे. त्याचबरोबर लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी सक्तीचा परवाना देण्याचे धोरण रद्द करण्यात आले आहे. खरगे यांनी कोरोनाच्या युद्धातील सर्वात महत्वाची लस, पीपीई किट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर आणि रुग्णवाहिकांवर जीएसटी लागू न करण्यास सांगितले आहे.

विरोधी पक्षांनी दिलेले 9 सल्ले 

जिथूनही शक्य असेल तिथून लस खरेदी करा
देशभरात मोफत लसीकरण कार्यक्रम चालवा
देशांतर्गत स्तरावर लस उत्पादन वाढवा
लस उत्पादन वाढविण्यासाठी परवाना काढा
पीएम केअर फंडमधून आणखी निधी जारी केला जावा
लसीसाठी 35 हजार कोटींचे बजेट वाटप
सेंट्रल व्हिस्टा प्रोग्रामवर बंदी घालावी
बेरोजगारांना दरमहा 8 हजार रुपये द्यावे
कृषी कायदा मागे घ्यावा