अनेकांना धक्का! गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड; राजकारणी, पोलीस, व्यवसायिकांचा समावेश

घोटाळ्याचे वैशिष्ट्य असे की, या घोटाळ्यानुसार केवळ चित्रिकरण केले तरी त्यातून एक चित्रपट तयार होऊ शकतो

Updated: Aug 11, 2018, 12:09 PM IST
अनेकांना धक्का! गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड; राजकारणी, पोलीस, व्यवसायिकांचा समावेश title=

अहमदाबाद: गुजरातमध्ये सुमारे ३ अब्ज डॉलर इतक्या महाकाय रकमेइतका घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. हा घोटाळा बिटकॉइनशी संबधीत असल्याचे प्रथमदर्शनी वृत्त आहे. या घोटाळ्याचे वैशिष्ट्य असे की, या घोटाळ्यानुसार केवळ चित्रिकरण केले तरी त्यातून एक चित्रपट तयार होऊ शकतो. हा घोटाळा इतका मोठा आहे की, तो सध्या चर्चेत असलेल्या पीएनबी घोटाळ्यालाही मागे टाकतो. पीएनबी घोटाळा केवळ १.३ अब्ज रूपयांचा आहे. या घोटाळ्यात राजकीय नेते, व्यावसायिक आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे.

बिटकॉइनच्या माध्यमातून मागितली खंडणी

ब्लूमबर्गच्या हवाल्याने  एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात प्रॉपर्टी डेव्हलपर शैलेश भट्ट हे गुजरातच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी दावा केला की, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण करून २०० कोटींची खंडणी मागितली. तसेच, खंडणीची ही रक्कम बिटकॉईनच्या रूपात द्यावे असेही त्यांनी सांगितले. ज्याची रक्कम सुमारे १.८ अब्ज रूपये (सुमारे ९ कोटी रूपये) इतकी होते.

भाजपच्या माजी आमदाराचे नाव

शैलेश यांचा दावा गृह्य धरून त्यातील सत्यता पडताळण्यासाठी हे प्रकरण गृह विभागाने राज्याच्या सीआईडीकडे सोपवले. आशीष भाटीया यांच्या नेतृत्वाखाली एक समितीही बनली. प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान, संशय व्यक्त करण्यात आला की, भट्ट यांच्या अपहरणाचा बनाव त्यांचाच सहकारी किरीट पलडियानेच रचला होता. पलडियाचे काका आणि भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया हे सुद्धा या कटात सहभाही होते. 

तक्रारकर्ताच संशयाच्या फेऱ्यात

चौकशी दरम्यान एक एक धक्कादायक गोष्टी पुढे येऊ लागल्या. इतक्या की, चक्क तक्रारकर्ता शैलेश भट्ट स्वत:च या प्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकला. पलडिया अद्यापही तुरूंगातच आहे. मात्र, भट्ट आणि माजी आमदार कोटडिया यांनी पळ काढला आहे. एप्रिलमध्ये कोटडियाने व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ पाठवून आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्याने या बिटकॉइन घोटाळ्याशी खुद्द शैलेश भट्टचाच हात असल्याचा दावा केला होता. कोटडियाने इशाराही दिला होता की, ते असे पुरावे देऊ शकतात की, ज्यामध्ये अनेक नेत्यांचेही नाव येऊ शकते.

कसा झाला घोटाळा

२०१६ते २०१७ या दरम्यानच्या कालावधीत शैलेश भट्ट याने बिटकनेक्ट नावाच्या एका क्रिप्टोकरंसी कंपनीत गुंतवणूक केली. ही कंपनी सतीश कुंभानी नामक व्यक्तिने बनवली होती. ही एक फेक स्किम होती. ज्याद्वारे जगभरातील गुंतवणूकदारांना बिटकनेक्टमध्ये आपापले बिटकॉइन जमा करण्यास सांगण्यात आले. जमा केलेल्या करन्सीवर ४० टक्के परतावा देण्याचेही आमिष दाखवण्यात आले. ही कंपनी बिटकॉइन जमा करणाऱ्यांना बिटकनेक्ट कॉइन्स देत असे. सोबतच जो गुंतवणूकदार अधिक रक्कम गुंतवेल त्याला तितका अधिक परतावा भेटेन असेही सांगण्यात आले होते. बिटकनेक्टमध्ये आतापर्यंत ३ अब्ज डॉलर इतके बिटकॉइन जमा करण्यात आले होते.

नोटबंदीचाही परिणाम

दरम्यान, गेल्या वर्षी प्रति बिटकॉइनची किंमत सुमारे १ हजार डॉलर्सवरून वाढून ती १९, ७०० डॉलर्सवर पोहोचली तेव्हा बिटकॉइनचा भावही वाढत गेला. दरम्यान, नोटबंदी झाली. नोटबंदीमुळे हैराण असलेल्या काळ्या पैसेवाल्यांनी बिटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्या काळातील गुगल सर्चवर नजर टाकली तर, काळा पैसा कसा गुंतवावा याबाबत माहिती सर्च केल्याची मोठी आकडेवारी मिळते.

अमेरिकेत खटला 

या प्रकरणाची मुळं केवळ गुजरात किंवा भारतातच आहेत असे नाही. ती अमेरिकेपर्यंत पोहोचली आहेत. अमेरिकेतील सहा उद्योगपतींच्या एका समुहाने बिटकनेक्टविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर ४ जानेवारी २०१८ ला टेक्सास आणि त्यानंतर पाच दिवसांनी नॉर्थ केरॉलिनानेही बिटकनेक्ट विरोधात सीज अॅण्ड डेसिस्ट ऑर्डर दाखल केले.

गुंतवणूकदार चौकशीच्या फेऱ्यात

दरम्यान, सीआयडी चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतातही बिटकॉइन गुतंवणूकदारांविरोधात चौकशीने वेग घेतला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जर तपास यंत्रणेच्या हाती आपले नाव आले तर आपण पकडले जाऊ आणि त्याचसोबत आपल्या काळ्या पैशांची माहिती उघड होईल. त्यामुळे शैलेश भट्टने किरीट पलडियासह आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत बिटकनेक्टच्या दोन प्रतिनिधींचे सूरतमधून अपहरण केले आणि त्यांना २, २५६ बिटकॉइन्सची खंडणी मागितली. 

पलाडियाच्या स्वार्थामुळे भांडाफोड

दरम्यान, हे प्रकरण तिथेच दडपले जाण्याची शक्यता होती. पण पलाडियाच्या स्वार्थामुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यांने आपले काका आणि माजी आमदार नलिन कोटडिया यांच्याशी संपर्क केला. त्याने स्थानीय पोलिस आणि प्रशासनाचा वापर करत आपल्या काकांच्या दबंगगिरीचाही फायदा उठवला. त्याने शैलेश भट्ट यांच्याकडून बिटकॉइन स्वरूपात खंडणी घेण्याची योजना आखली. ही सर्व माहिती पोलिसांनी तपासलेली कागदपत्रे, तपास यंत्रणांनी घेतलेल्या मुलाखती यांमधून पुढे आली आहे.

काका-पुतण्यांनी आपला खेळ तर खेळला. ते निर्धास्त झाले. पण, हे प्रकरण इथेच थांबले नाही. त्यांना वाटत होते की, शैलेश भट्ट पोलिसांमध्ये जाणार नाहीत. मात्र, घडले भलतेच. शैलेश भट्ट थेट पोलिसांतच नव्हे तर, थेट गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच पोहोचले.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने क्रिप्टो करन्सी व्यवहारावर बंदी घातली आहे. त्यावर क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज्सनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. ज्यावर सप्टेबरमध्ये पुन्हा सुनावनी होणार आहे.