उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.  

सायली पाटील | Updated: May 3, 2023, 08:00 AM IST
उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?  title=
Cyclone Mocha live location and formation date latest updates

Cyclone Mocha News: हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांसोबतच काही महत्त्वाचे इशारे देत IMD नं कायमच नागरिकांना सतर्क केलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एक महत्त्वाचा इशारा देत हवामान विभागानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कारण, 6 मे च्या जवळपास दक्षिण- पूर्व बंगालच्या खाडीनजीक असणाऱ्या भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, त्यामुळं पुढच्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हे 2023 या वर्षातील पहिलं चक्रीवादळ ठरणार आहे.

यूरोपच्या सेंटर फॉर मेडियम- रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) आणि अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीम (GFS) यांच्याकडून बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी वातावरण निर्मिती होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर भारतीय हवामान विभागानं यासंदर्भातील सविस्तर वृत्त जारी केलं.

वादळाला कसं मिळालं 'मोचा' हे नाव?

अधिकृत माहितीनुसार जागतिक हवामान संस्था आणि संयुक्त राष्ट्रांच्या ESCAP मधील सदस्य राष्चट्रांच्या वतीनं स्वीकारण्यात आलेल्या प्रणालीनुसार या वादळाचं नाव Cyclone Mocha असं निर्धारित करण्यात आलं आहे. यमननं तांबड्या समुद्रकिनारी असणाऱ्या मोचा या बंदराच्या नावावरून या चक्रीवादळाचं नाव सुचवल्याची माहिती समोर येत आहे.

ओडिशा प्रशासन सतर्क, तातडीनं बोलावल्या बैठका...

चक्रिवादळाचे परिणाम पाहता त्या अनुषंगानं तयार राहण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीनं उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यामध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. यापूर्वी आलेल्या fani cyclone चा संदर्भ देत उन्हाळी वातावरणामध्ये चक्रीवादळाचा मार्ग निर्धारित करण्यामध्ये अडचणी येतात अशी वस्तुस्थितीही मांडली.

सोबतच, गरज भासल्यास सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करत चक्रिवादळाच्या परिणामांना पाहता त्या दृष्टीनं बचाव कार्य मार्गी लावावीत असे निर्देश दिले, ज्यानंतर यंत्रणा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं.

हेसुद्धा वाचा : Weather Forecast Today: उकाडा वाढणार, त्याआधी पाऊस झोडपणार; चित्रविचित्र हवामानानं व्हाल हैराण

दरम्यान, आयएमडीनं चक्रीवादळाचा इशारा दिलेला असतानाच स्कायमेट या खासगी संस्थेनं मात्र मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उष्णकटीबंदीय वादळाची शक्यता कमी असल्याची माहिती दिली. सोबतच एप्रिलमध्येही भारतीय सागरी सीमेत कोणत्याही वादळाची परिस्थिती दिसली नसल्याचंही स्पष्ट केलं.

असं असलं तरीही सध्या वादळाच्या पार्श्वभूमीवर येत्या काही तासांमधील हवामानाकडे यंत्रणांची नजर असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि दक्षिण भारताचा बहुतांश किनारपट्टी भाग इथं पावसाची हजेरी असेल. त्यामुळं ओडिशासोबतच या भागांमध्ये कमीजास्त स्वरुपात वादळाचे परिणाम दिसू शकतात.