Maharashtra Weather Forecast Today: महाराष्ट्राच्या काही भागासह मुंबईमध्ये 2 ते 6 मे या दरम्यानच्या काळात हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी आणि ढगांचा गडगडाट असं एकंदर हवामानाचं चित्र पाहायला मिळू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवत असताना यामुळं कोणकोणत्या जिल्ह्यांवर थेट परिणाम होईल याचाही अंदाज वर्तवत नागरिकांना सतर्क केलं आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकिकडे पावसाचा इशारा असतानाच धुळे, नंदुरबार, पुण, लातूर या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासग सोसाट्याचा वारा आणि गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. या पावसाळी वातावरणानंतर दिवसातील काही तास प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
Skymet या संस्थेकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार 5 मे पासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. ज्यानंतर पुन्हा 6 मे रोजी देशातील काही भागांत पावसाची हजेरी असेल. 8 मे नंतर पाऊस पुन्हा निरोप घेताना दिसणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप येथे मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी बरसतील. तर, छत्तीसगढ, तेलंगणा, दमण आणि कर्नाटकचा अंतर्गत भागही पावसामुळं ओलाचिंब होईल. काही भागांमध्ये मात्र दुपारच्या वेळी तापमानाचा दाह सतावणार आहे.+
देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागामध्ये असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होणार असून, रस्तेवाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसतील. काश्मीरचं खोरं आणि स्पितीचं खोरं या भागांमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं तिथं येत्या काळात पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर, उत्तराखंडमध्येही काही भागात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज असल्यामुळं चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज पाहूनच पुढील बेत आखावेत असं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.