मुंबई : केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) लोकसभा खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या मृत्यूच्यावृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोमवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये खासदार मोहन यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ज्या खोलीत खासदारांनी आत्महत्या केली. त्याठिकाणी सहा पानांची सुसाइड नोटही (Suicide Note) पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये 40 जणांची नावे आहेत.
मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटबाबत तपास सध्या फॉरेन्सिक विभाग करीत आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. फॉरेन्सिक टीमने हॉटेलच्या खोलीत तपास केला. ज्या खोलीत मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला.
दरम्यान, खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मुंबईत काय करीत होते? पोलीस चौकशीनंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळणार असली तरी मोहन डेलकर यांनी गेल्या आठवड्यात जेडीयूच्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. नेत्यांसमवेत दादरा आणि नगर हवेलीच्या परिस्थितीविषयी त्यांनी चर्चा केली. ते खासदारांचे प्रतिनिधीमंडळ घेण्यासाठी मुंबईत आले होते आणि 23 फेब्रुवारीला खासदारांना सोबत घेणार होते.
मोहन डेलकर (58) हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले.