मागील ५ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट- आरोग्य मंत्रालय

मृत्यूदरही कमी...

Updated: Aug 19, 2020, 09:45 AM IST
मागील ५ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट- आरोग्य मंत्रालय  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढच झाली. परंतु मागील 5 दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आता देशातील कोरोनाचा पीक पॉईंट संपला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगतिलं की, देशात संसर्गग्रस्तांची संख्या कमी होत आहे. देशात कोरोनाच्या पीक पॉईंटबद्दल काय परिस्थिती आहे, याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, 'आम्ही अधिक मॅथेमॅटिकल मॉडेलवर विश्वास करत नाही. आमच्यासाठी कोरोनाचा पीक पॉईंट असं काहीही नाही. भारत सरकारचं संपूर्ण लक्ष कंटेन्मेंट, अधिक टेस्टिंग आणि उत्तम इलाज यावरच आहे.'

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 13 तारखेला 24 तासामध्ये 66,999 कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. 
- 14 ऑगस्टला 64,553  रुग्ण तर 1007 मृत्यू
-  15 ऑगस्ट 65,002 नवे रुग्ण, 996 मृत्यू
- 16 ऑगस्ट 63,490 नव्या रुग्णांची वाढ, तर 944 बळी
- 17 ऑगस्टला 57,981 नवे कोरोनाग्रस्त आढळे तर 941 दगावले 
- 18 ऑगस्टला दिवसभरात 55,079 नवे रुग्ण, 876 मृत्यू

निती आयोग, एमपॉवर्ड ग्रुपचे प्रमुख डॉ. वीके पॉल यांनी सांगतिलं की, लोकांना अजूनही अधिक सावध राहण्याची गरज आहे. या संसर्गामध्ये घेतली जाणारी काळजी महत्त्वाची आहे. आपल्या देशात लस डेव्हलप होत आहे. लशीची टेस्टिंग योग्य दिशेने पुढे जात, मात्र यासाठी किती काळ लागेल हे सांगता येणार नसल्याचं ते म्हणाले. 

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 2 हजार 742 इतकी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 77 हजार 779 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे.