Video : राष्ट्रपती भवनात दिसणारी सावली कोणाची? बिबट्या की मांजर? दिल्ली पोलिसांनी अखेर केला खुलासा

Wild animal In rashtrapati bhawan : राष्ट्रपती भवनातील 12 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका प्राण्याची सावली दिसत होती. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठा खुलासा केलाय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 10, 2024, 08:53 PM IST
Video : राष्ट्रपती भवनात दिसणारी सावली कोणाची? बिबट्या की मांजर? दिल्ली पोलिसांनी अखेर केला खुलासा title=
Delhi Police On wild animal rashtrapati bhawan

Delhi Police On Wild animal : लोकसभा निवडणुकीतील मिळवलेल्या बहुमतानंतर रविवारी राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) एनडीएचा शपथविधी सोहळा (NDA Oath Ceremony) पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर आणखी 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी अनेक देशविदेशातील दिग्गज उपस्थित होते. देशांचे नेते, उद्योजक, बॉलिवूड स्टार्स देखील उपस्थित होते. मात्र, 12 सेकंदाच्या व्हायल व्हिडीओमुळे (Viral Video) चर्चेला उधान आलं होतं. राष्ट्रपती भवनात बिबट्या असल्याची (Wild animal In rashtrapati bhawan) अफवा उडाली होती. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी खुलासा केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक 12 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित खासदार दुर्गा दास यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यमंत्रीपदाची शपथ देत होत्या. यावेळी शपथ पूर्ण झाल्यानंतर ते अभिवादन करण्यासाठी उठले असता मागे एक प्राणी चालताना दिसला. तर अजय टमटा हे सुद्धा शपथ घेत असताना हा प्राणी थेट त्यांच्या मागेच दिसत होता. तो प्राणी नेमका कोण, यावरून दिवसभर तर्कवितर्क लढवण्यात येत होते. हा प्राणी बिबट्या आहे का याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. अखेर ती मांजर असल्याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलंय.

दिल्ली पोलिसांनी काय म्हटलंय?

दृष्यात दिसत असलेली प्रतिमा मांजर होती. त्याचीच सावली आकाराने मोठी दिसत होती. काही मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडल काल आर.पी. भवन येथे झालेल्या शपथविधीच्या थेट प्रक्षेपणादरम्यान प्राणी दाखवत आहेत आणि तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत. समारंभात वन्य प्राण्याचे दावे खोटे आहेत. ते जंगली नव्हते. अशा निराधार अफवांकडे दुर्लक्ष करा, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, प्राण्याच्या आकारावरून तो बिबट्या असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. काही लोक म्हणत होते की कदाचित तो पाळीव प्राणी आहे. तर काहींनी बिबट्या असल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर अनेक चर्चेला उधाण आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर उत्तर द्यावं लागलं. राष्ट्रपती भवन म्हणजे देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक मानलं जातं. तिथं सुरक्षा कर्मचारी आणि सीसीटीव्ही द्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. त्यामुळे बिबटया असणं शक्यच नाही, असा अंदाज होता.